महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे चरित्र वाचून साजरी करावी..... प्रा. डॉ. महेश मोटे

 महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे चरित्र वाचून साजरी करावी..... प्रा. डॉ. महेश मोटे 





मुरुम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वैचारिक दृष्ट्या  समृद्ध करण्यासाठी महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत. तरुणांनी महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे चरित्र वाचून साजरी करावी,  असे प्रतिपादन राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. 
मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “ छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक योद्धे ” या विषयावर सोमवारी (ता. २०) रोजी व्याख्यान देताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले होते. यावेळी फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रविंद्र आळंगे, प्रा. डॉ. सुशील मठपती, प्रा. दिपाली स्वामी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.                               पुढे बोलताना प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व तरुणांसमोर आदर्श आहे. त्यांनी त्यांच्या मावळ्यांना सोबत घेऊन अनेक लढाया केल्या व जिंकल्या. कारण त्यांचे नियोजन ते अतिशय बारकाईने करत असत. गनिमी कावा वापरून बलाढ्य शत्रूंना धूळ चारण्याचे काम शिवरायांनी केले होते. ते एक उत्तम प्रशासक होते. गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे कैवारी होते. दांडपट्टा, तलवारबाजीत पटाईत होते. तोरणा, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे अनेक गड किल्ले महाराजांनी जिंकून स्वराज्यात आणले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे ‘ भान ठेवून योजना आखत व बेभान होऊन त्याचे अंमलबजावणी करीत असत. ’ त्यामुळेच ते अनेक लढाया जिंकू शकले. राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंधश्रद्धा, भूत प्रेत, भानामती हे थोतांड आहे. हे त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. ‘ शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, ’ असा आदेश देणारे राजे स्त्रियांना सन्मान देणारेही होते. “ इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ” छत्रपती शिवाजी महाराज हे सामाजिक क्रांती करणारे, लोकपालक, उत्तम प्रशासक, पर्यावरण रक्षक, जलतज्ञ होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रविंद्र आळंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुदीप ढंगे, अमोल कटके, शंभुराजे काजळे, चंद्रकांत पुजारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका काजळे तर आभार प्रा. दिपाली स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   

Post a Comment

أحدث أقدم