केंद्रीय अर्थसंकल्पाने मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली
लातूर/ प्रतिनिधी-नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे यंदाही मराठवाडा उपेक्षित राहिला आहे. दुर्दैव म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मराठवाड्याकडे असतानाही मराठवाड्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याची कडवी प्रतिक्रिया मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माजी संचालक ॲड. भारत साबदे यांनी येथे दिली.
वर उल्लेखलेले महत्वाची दोन्ही खाते मराठवाड्याकडे असल्यामुळे मराठवाडा वाशीयांच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु मराठवाड्याच्या पदरात फक्त निखारेच यावेत यापेक्षा दुर्दैव ते काय ? असा प्रश्नही त्यांनी हताशपणे उपस्थित केला.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास होण्याचे फार मोठे आव्हान या लोकप्रतिनिधीकडून पार पडेल असा विश्वास वाटत होता. मराठवाड्याचे दोन्हीही मंत्री मराठवाड्याच्या प्रश्नाची चांगली जाण असलेले नेते म्हणून ओळखली जातात परंतु हे मंत्रीच काय मराठवाड्यातील खासदारही दिल्लीत जाऊन गोट्या खेळत बसतात आणि मराठवाड्याला न्याय देऊ शकत नाहीत. हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
إرسال تعليق