पीकविम्यासाठी शेतकरी घालणार खा. शृंगारे यांच्या निवासस्थानी साकडे

 पीकविम्यासाठी शेतकरी घालणार खा. शृंगारे यांच्या निवासस्थानी साकडे

 लातूर-जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याला यावर्षी सुलतानी व असमानी संकटाने बेजार केलेले आहे. काळ्या आईची ओटी भरून रिकामा झालेला बळीराजा अधिकच कंगाल झालेला आहे. खरीपाचा पीकविमा भरला मात्र त्याचा कसलाच परतावा मिळालेला नाही. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्रसरकारची आहे. त्यामुळे आपल्या भागातील शेतकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून खासदार संसदेत आहेत. हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न खासदार शृंगारे यांनी मांडलेला नाही. तो संसदेत मांडला पाहिजे व शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी शेतकरी चळवळीतील नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे आणि अरूणादादा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली २२  फेब्रुवारी २०२३ रोजी खा. शृंगारे यांच्या लातूर निवास्थानी शेतकरी चटणी भाकर खाऊन साकडे घालणार असल्याचे निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांना दिल्याचे प्रसिद्धी पत्रक संयोजक राजीव कसबे यांनी प्रसिद्ध केले आहे.
अतिवृष्टी, गोगलगाय व सततधार पाऊस अशा नैसर्गिक संकटाच्या खाईत बळीराजा सापडला गेला आहे. प्रचंड नुकसान झाले आहे. आपल्याकडे आहे तेवढे काळ्या आईची ओटी भरण्यात खर्ची झाले आज मात्र तो कंगाल झालेला दिसून येत आहे. अशा प्रसंगी शेतकर्‍यांचा उसना कैवार घेणारे सत्ताधारी व विरोधक निवडणुकीच्या काळात अमाप घोषणा करतात परंतु आज मात्र हक्काचा पिक विमा मिळवून देण्यासाठी गप्प गुमान आहेत. ही दुटप्पी भूमिका शेतकर्‍यांसाठी असह्य करणारी आहे.
खासदार हे लोकसभेत आपल्या लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताहेत परंतु शेतकर्‍यांच्या पिकविम्याबाबत आवाक शब्द ही काढत नाहीत. पिकविमा कंपनी ही केंद्र सरकारची आहे म्हणूनच की काय ते गप्प आहेत. शेतकर्‍यांच्या मतावर निवडून जाऊन शेतकर्‍यांना न्याय देऊ शकत नसाल तर आम्हाला तुमच्या निवासस्थानी येवून चटणी भाकर खाऊन साकडे घालण्याशिवाय पर्याय काय ? म्हणूनच आपणांस सदबुद्धी यावी व येणार्‍या २० फेब्रुवारी पर्यंत पिकविमा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे अन्यथा २२  फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या घरी आम्ही साकडे घालू. अशी भूमिका निवेदनकर्‍यांनी घेतली आहे. निवेदनावर सर्वश्री सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुणदादा कुलकर्णी, राजीव कसबे, नवनाथ शिंदे, अशोक भाऊ दहिफळे, माधव कवटाळे, नारायण नरखेडकर, दगडू बरडे, गोरोबाकाका मोदी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم