कृषी कार्यालयात शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

 कृषी कार्यालयात शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

औसा :फळबाग लागवडीचे बिल मिळत नसल्याने औसा तालुक्यातील एकंबी येथील भागवत उत्तम सगर या २५ वर्षीय तरुण शेतक-याने येथील तालुका कृषी कार्यालयात सोमवारी दि २७ फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन शेतक-यास आत्महत्येस प्रवृत्त करणा-या दोषीं विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी संघटना व संभाजी सेनेने केली आहे.

राज्यात फळबाग लागवड करण्यात औसा पॅटर्नचा टेंबा मिरवणा-या तालुका कृषी विभागाच्या टेंब्याखाली शेतकरी कसा पिळतो याचे उत्तम उदाहरण एकबी (ता.औसा) येथील तरुण शेतकरी भागवत उत्तम सगर यांच्या घटनेवरून समोर आले आहे. आई सुमनबाई उत्तम सगर यांच्या साडे चार एकर तर चुलत भावाच्या नावे अडीच एकर, शेतात बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी अर्ज केला त्याला मंजुरी ही मिळाली त्या नंतर कृषी सहायकाने खड्डे पडण्यास सांगितले आणि आणि सगर कुटूंबियांनी खड्डे ही पाडले.

सदर खड्डे चुकीचे असल्याचे सांगून पुन्हा नव्याने खड्डे पाडायला लावले एकीकडे दोन वेळा खड्डे आणि मंजुरीसाठी लाखाचा खर्च करावा लागला. यामुळे खड्डे पाडले याचे बिल मिळावे म्हणून कांही दिवसापासून भागवत सगर कृषी विभागात चकरा मारत होते मात्र त्यांना कुणीही दाद देत नव्हते. लोकांची उसनवारी करून फळबाग लागवड करण्याचे स्वप्न बाळगून सगर कुटूंबियांनी मेहनत घेतली मात्र त्यांना कामाचे बिल मिळत नसल्याने पुढील प्रक्रिया करणे गरजेचे होते. कृषी विभागातील खाऊगिरी वृत्तीमुळे आज एका २५ वर्षीय तरुण शेतक-याला टोकाचे पाऊल उचलावे लागले हे दुर्दैवी आहे. भागवत सगर यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

Post a Comment

أحدث أقدم