महाडीबीटी पोर्टलवर 20 मार्चपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर: जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी लॉगीनवरील प्रलंबित, नवीन भरावयाचे अर्ज 20 मार्च 2023 पर्यंत मंजुरीसाठी महाविद्यालयामार्फत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या लॉगीनवर ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (फ्रीशीप), राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास दिनांक 22 सप्टेंबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.
सर्व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांनी आपले लॉगीनवरील अर्ज मंजुरीसाठी 20 मार्च 2023 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांच्या लॉगीनला ऑनलाईनवर पाठवावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी केले आहे. तसेच महाविद्यालय स्तरावर अथवा विद्यार्थी लॉगीनवर अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, असे त्यांनी कळविले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापूर्वी आधार संलग्नित ‘युजर आयडी’ तयार करून अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नवीन ‘नॉन आधार युजर आयडी’ तयार करू नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास आणि एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयाची राहील, असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
إرسال تعليق