“मुलींनी स्व: अस्तित्व निर्माण करून स्वप्नपूर्ती करावी”-मुख्य लेखा अधिकारी कांचन तावडे

 “मुलींनी स्व: अस्तित्व निर्माण करून स्वप्नपूर्ती करावी”-मुख्य लेखा अधिकारी कांचन तावडे

लातूर-आज सर्वच क्षेत्रामध्ये मुली नेत्रदीपक प्रगती साधत आहेत. तेव्हा त्यांनी आपले स्व: अस्तित्व निर्माण करून स्वप्नपूर्ती करावी असे प्रतिपादन लातूर शहर महानगरपालिका येथील मुख्य लेखा अधिकारी कांचन तावडे यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी आणि महिला तक्रार निवारण समिती, लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.  
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे हे होते तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव अॅड. श्रीकांतप्पा उटगे, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर उपप्राचार्य सुचिता वाघमारे, प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, प्रा. वनिता पाटील, डॉ. शितल येरुळे आणि डॉ.श्रद्धा अवस्थी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कांचन तावडे म्हणाल्या की, प्रत्येक मुलींनी स्वतःच्या स्वप्नासाठी जगता आलं पाहिजे. आपण स्वतःची ओळख निर्माण करतो तेव्हा समाजामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण होतं
असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बीजभाषक म्हणून बोलताना उपप्राचार्य सुचिता वाघमारे म्हणाल्या की, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे. आज जगातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान काम आणि समान रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. साक्षरता म्हणजे शिक्षण नाही. सर्व मुलींना शिक्षण दिलं जात आहे परंतु दहावीनंतर मुलींचे शिक्षण बंद केलं जातं. स्त्रियांना शिक्षण आणि रोजगार ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जगभरातील सर्व स्त्रियांचे प्रश्न सारखेच आहेत. आजही समाजात स्त्री मुलींचा जन्म नाकारला जातो. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत मात्र स्त्री ही कुठेही सुरक्षित नाही. मुलांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला तर स्त्रियांना शिक्षण सहज घेता येईल असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश मौने म्हणाले की,  महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो असे सांगून जागतिक महिला दिनाच्या त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मन्मथप्पा लोखंडे म्हणाले की, आज महिलांनी आपल्यामधील क्षमतांचा उपयोग करून आपली प्रगती साधली पाहिजे. यासाठी समाजातील प्रत्येकानी त्यांना सहकार्य केले पाहिजे असे सांगून त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सहसचिव अॅड. श्रीकांतप्पा उटगे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे  यानीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वनिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रुपाली पाटील आणि प्रा. जयश्री पाटील यांनी केले. तर आभार डॉ.शीतल येरुळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कल्पना गिराम, डॉ.अश्विनी रोडे, प्रा. मीनाक्षी नीला, प्रा. सरपे, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. अलका चिकुर्डेकर, प्रा. स्वामी सोनू, प्रा. शितल झुंजे, प्रा. संपदा लखादिवे, प्रा. अर्चना लखादिवे, प्रा. गित्ते, प्रा. वाघमारे, डॉ. गीता गिरवलकर, डॉ. भाग्यश्री दाणे यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

أحدث أقدم