सातत्य आणि आत्मविश्वासाने जिवनात यशाची शिखरे गाठता येतात-डॉ. विठ्ठल लहाने

 सातत्य आणि आत्मविश्वासाने जिवनात यशाची शिखरे गाठता येतात-डॉ. विठ्ठल लहाने 

यांचा कानमंत्र; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात बी. डी. एस. पदवी समारोप समारंभ संपन्न

 

लातूर, दि. 10 – कोणत्याही क्षेत्रात नावलौकीक होण्यासाठी अफाट परिश्रम करावे लागतात. एक रात्रीत कोणासही यश मिळत नसते. त्यासाठी अनके वर्षांची तपश्चर्या आणि त्याग करणे गरजेचे असून सातत्य आणि आत्मविश्वास यांची जोड देऊन जिवनात यशाची शिखरे गाठता येतात, असा कानमंत्र सुप्रसिध्द प्लास्टीक सर्जन डॉ. विठ्ठ्ल लहाने यांनी विद्यार्थ्यांना दिला.

लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बी. डी. एस. 2017 बॅचच्या पदवी समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल लहाने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी व्यासपीठावर माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेचे विश्वस्त तुळशीराम अण्णा कराड, सौ. सुमित्रा तुळशीराम कराड, उप प्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, डॉ. अमोल डोईफोडे, मुख शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. सिराज बादल, दंत शैक्षणिक समितीच्या समन्वयक डॉ. शिल्पा बिक्कड, सदस्या डॉ. गौरी उगले, डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. प्रियंका लासुणे, डॉ. तृप्ती गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले की, रुग्ण सेवेचा वसा प्रत्येक डॉक्टने जपणे गरजेचे आहे. रुग्णसेवेतूनच डॉक्टरची खरी ओळख निर्माण होत असते. प्रामाणीक सेवेतून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचा बंध निर्माण होतो. तो विश्वास आणि बांधीलकीची जपवणूक करणे हे प्रत्येक डॉक्टरचे अद्य कर्तव्य आहे. दंत शाखेची पदवी मिळवल्यानंतर पुढे दंत रुग्णांच्या सेवेबरोबरच एम.डी.एस. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर अनेक वर्ष सातत्याने दंत रुग्णांना सेवा दिल्यानंतर आपण दंतरोग तज्ञ म्हणून नावारुपाला येवू शकतो.

जीवनात येणाऱ्या संकटांना आणि आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपल्या आई-वडीलांशी निकोप आणि निस्वार्थ नाते जपणे ही आजच्या काळाची निकड बनली आहे. मिळालेले कर्तत्व टिकवण्यासाठी आपली कौटूंबीक नाळ घट्ट् असणे गरजेचे आहे. याकरीता आपल्या वैयक्तीक, कौटूंबीक आणि व्यावसायीक जिवनाचा समतोल राखण्यासाठी वेळेचे अचुक नियोजन करावे, असे डॉ. लहाने यांनी शेवटी सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, तरुणांची शिक्षण, संशोधन आणि सेवेवर भक्ती असणे आवश्यक आहे. त्यानंतरच संपूर्ण जग हे सेवेसाठी खुले व्यासपीठ आहे. अनन्यसाधारण साधना आणि कर्तव्यनिष्ठेतूनच या व्यासपीठावर जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. सर्व प्रकारच्या परिस्थितीत काम करण्याची मानसिकता ठेवून सेवाभाववृत्तीने आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या हितासाठी करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करण्याची ग्वाही, त्यांनी दिली.

त्यानंतर डॉ. यतीशकुमार जोशी, पालक प्रतिनिधी व बी.डी.एस. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाराव्या बॅचच्या बी.डी.एस. पदवी उतीर्ण डॉक्टरांना उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांनी दंत शल्य चिकित्सक संहिता शपथ दिली. या कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली तर समारोप पसायदानाने झाला. या कार्यक्रमास सन 2017-2023 बी. डी. एस. बॅचचे विद्यार्थी व त्यांचे पालक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

------------------------------------

Post a Comment

أحدث أقدم