महात्मा बसवेश्वर पुतळा प्रकरणी जनभावने सोबतच-माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर
पुतळा स्थलांतरीत होणार नाही यासाठी वचनबध्द
लातूर प्रतिनिधी:-शहरातील कव्हा नाका येथे असलेल्या महात्मा बसवेश्वर यांचा अश्वरूढ पुतळा प्रत्येक लातूरकरांची अस्मिता आहे. राष्ट्रीय महामार्गांवर असलेला हा पुतळा स्थलांतरीत करण्यात येणार असे प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे. मात्र हा पुतळा स्थलांतरीत होवू नये अशी जनभावना आहे. या प्रकरणी आम्ही जनभावने सोबतच असुन जनभावनेचा आदर करत हा पुतळा स्थलांतरीत होवू देणार नाही यासाठी आपण वचनबध्द असल्याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा स्थलांतरीत होवू नये यासाठी डॉ.अरविंद भातांब्रे यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपोषण स्थळी भेट देवून डॉ.भातांब्रे यांचेशी याविषयी चर्चा केली तसेच याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्गं लातूर शहरातून जात आहे. या राष्ट्रीय महामार्गांवर असलेला महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा स्थलांतरीत करण्यासाठी प्रशासनाकडुन पत्रव्यवहार करून हालचाली करण्यात येत आहेत. मात्र सदर पुतळा स्थलांतरीत होणार नाही किंवा तो एक इंचही हालणार नाही. अशी भूमिका यापूर्वीच मांडली असल्याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. पुतळा स्थलांतरीत होवू नये अशी प्रत्येक लातूरकरांची जनभावना आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा प्रत्येक लातूरकरांची अस्मिता असुन ती अस्मिता जपण्याचे काम लोकप्रतिनिधी या नात्याने आपण पार पाडणार आहोत. पुतळा स्थलांतरीत होवू नये याकरीता यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. पुतळा आहे त्या जागेवर राहावा याकरीता विविध पर्याय समोर येत असुन यापैकी योग्य तो पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी चर्चा करून अंतिम करण्यात येईल असे सांगत याठिकाणी उड्डाणपुल करण्याचा पर्यायही केंद्रीयमंत्री गडकरी यांना सुचविण्यात येणार आहे. याप्रकरणी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सुध्दा स्थानिक जनभावना लक्षात घेवूनच निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केलेले आहे. लवकरच याबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळासोबत आपण स्वत: जाणार असल्याचेही माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी डॉ.अरविंद भातांब्रे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली असुन आपण जनभावने सोबतच असुन पुतळा स्थलांतरीत होणार नाही यासाठी वचनबध्द असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपाच्या प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, लातूर शहर जिल्हा संघटन सरचिटणीस अॅड.दिग्विजय काथवटे, शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कौळखेरे, माजी नगरसेवक शैलेश स्वामी, संजय रंदाळे, पुष्पराज खुब्बा, आदीची उपस्थिती होती.
प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरून राजकारण करण्याचा प्रयत्न
पुतळा स्थलांतर प्रकरण काहीजण प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरून राजकारण करत असल्याचा आरोप माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केला. या राजकारणाच्या माध्यमातून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा हेतू यामागे असल्याचे सांगितले. ज्या प्रशासकीय अधिका-यांकडुन हे सर्व होत आहे त्याची दखल घेण्यात येत असूण याबाबत शासनस्तरावरही सांगण्यात आले आहे. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारकडुन योग्य दखल घेवून त्या प्रशासकीय अधिका-यांवर कार्यवाहीची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच याप्रकरणी जे कोणी राजकारण करत आहे त्याचा योग्य तो समाचार योग्य वेळी योग्य ठिकाणी घेण्यात येईल असा इशाराही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला.
إرسال تعليق