वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले 'वन वीक फॉर नेशन'चे अनुभव
लातूर/प्रतिनिधी:'सेवांकुर भारत'च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'वन वीक फॉर नेशन' या उपक्रमात सहभागी झालेल्या, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर आपल्याला आलेले अनुभव कथन केले.असे उपक्रम वारंवार व्हावेत आणि त्यात आम्हाला सहभागी होता यावे,अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
'सेवांकुर भारत'च्या वतीने दरवर्षी एक आठवड्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.यावर्षी मध्य प्रदेशातील दुर्गम भागात झाबुआ येथे हा उपक्रम राबविण्यात आला.त्यात लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात विविध वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.आठवडाभराचा उपक्रम पार पडल्यानंतर विवेकानंद रुग्णालयात आयोजित उपक्रमात विद्यार्थी आपल्याला आलेले अनुभव सांगितले.यावेळी पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका,डॉ.गोपीकिशन भराडिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत शिरोळे यांच्यासह विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राचे कार्यवाह डॉ.राधेशाम कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.
२००८ यावर्षी सेवांकुरची स्थापना झाली.आज वैद्यकीय शाखेतील ४५०० विद्यार्थी आणि व्यावसायिक त्याचे सदस्य आहेत. या अंतर्गत देशासाठी वर्षातून एक आठवडा काम करणे ही संकल्पना राबवली जाते.यावर्षी मध्य प्रदेशात दुर्गम भागात काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले.
अनोळखी व्यक्तींच्या घरी आम्ही राहिलो.सात दिवस त्यांच्यासोबत घालवले पण त्या व्यक्ती अनोळखी भासल्या नाहीत.हा प्रवास कसा झाला ते कळलेही नाही.जेंव्हा आपण स्वतःसाठी काही करतो ते कर्म असते,इतरांसाठी केलेले काम हे धर्म असते,असा अनुभव आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टरांची समाजात काय भूमिका असते ? हे लक्षात आले. आत्मविश्वास वाढला असेही विद्यार्थी म्हणाले.स्नेहा वाघमारे, विपुल दमकोंडवार,रोहन माने, संध्या कऱ्हाडे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.चंद्रकांत शिरोळे यांनी सेवांकुरच्या माध्यमातून विचारात संस्कृती पेरण्याचे काम केले जात असल्याचे मत मांडले.कुकडे काकांनी वैद्यकीय व्यवसाय समाधान देणारा असल्याचे सांगितले.मर्यादा सांभाळत,स्वार्थ बाजूला ठेवून हा व्यवसाय करावा लागतो.आपल्या धारणा योग्य रहाव्यात यासाठीच सेवांकूर काम करत असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी डॉ.राधेशाम कुलकर्णी, व विनोद कुचेरिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.राहुल हजारे यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन विश्वजित सरकटे व शिवानी सूर्यवंशी तर रोहन अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले.प्रणव राजहंस यांनी म्हटलेल्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास डॉ.अरुणा देवधर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह सागर कारंजे, धन्वंतर पाठक,विभाग प्रचारक राजेश संन्यासी,पत्रकार अरुण समुद्रे,जितेंद्र खंडाळकर,डॉ.
नितीन येळीकर,डॉ.अभय ढगे, डॉ.सी.व्ही.औरंगाबादकर,डॉ. गोविंद देशमुख,राहुल कुलकर्णी, विवेकानंद रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.गौरी कुलकर्णी,डॉ.नीलिमा कुलकर्णी, डॉ.अभिजीत मुगळीकर,डॉ. विजय विश्वकर्मा,डॉ.संजय शिवपूजे,डॉ.आशिष चेपुरे,डॉ. ओमप्रकाश भोसले यांच्यासह वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणारे दिडशे विद्यार्थी व ३० डॉक्टरांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
إرسال تعليق