थोर उपासक ज्ञानप्रकाशाचे:- श्री.युवराज घंटे सर

*थोर उपासक ज्ञानप्रकाशाचे:- श्री.युवराज घंटे सर*

*ज्ञानदानाचा मनी घेऊनी वसा,*
*ज्यांनी घडविले अनेक पामरा..!*
*म्हणून दौडतो आज अभिमानाचा*
*समाधानाचा आनंद पिसारा !!*
           वरील काव्यपंक्ती ज्यांना तंतोतंत लागू पडतात असे ज्ञानाचे थोर उपासक... एक ध्येयनिष्ट ,कर्तव्य दक्ष,गेल्या ३५ वर्षापासून ज्यांनी ज्ञानाची अखंड अविरत सेवा केली ते जि.प.प्रा.शा.बुधोडा शाळेचे  मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील एक व्यासंगी... अभिरुचीसंपन्न...  उत्साही... बहुआयामी... एक दिलदार व्यक्तीमत्व म्हणजेच श्री. युवराज घंटे सर !
           त्यांचा जन्म चाकूर तालुक्यातील *बावलगांव येथे अतिशय गरीब मजूर कुटुंबात* झाला.बालपणही अतिशय हालाखीतच गेले ; पण आईच्या सुसंस्कारित वृत्तीमुळे त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि *१९८५ मध्ये S.S.C बोर्डातून ८५.८५% मार्क्स घेणारे ते एकमेव विद्यार्थी होते हे विशेष !* पुढे डी.एड, एम.ए,  बी.एड...करून त्यांनी श्री. रघुवीर विदयालय,चामरगा येथून दि.०१/०७/१९८८ पासून सहशिक्षक म्हणून आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात केली. 
             त्यानंतर जि.प.प्रा.शा.घडोळी तांडा,जिंतूर. प्रा.शा.शिवनी कोतल,प्रा.शा. तळेगाव,देवणी. अशा उण्यापुऱ्या १० वर्षाच्या कालावधी नंतर लगेचच  त्यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याने प्रा.शा.करखेली,उदगीर. प्रा.शा.कव्हा,प्रा.शा. कातपूर,प्रा.शा. धनेगाव,लातूर. कन्या प्रा. शा.नळेगाव,चाकूर आणि प्रा.शा. बुधोडा,औसा..... यां शाळांत एक उत्तम मुख्याध्यापक म्हणून कार्य करून आज दि.३१ मे २०२३ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.सरांकडे पाहता ते कुठलेही काम आनंदाने उत्साहाने आणि आवडीने करतात. ते शिस्तीचे मोठे भोक्ते आहेत. *कर्म हाच धर्म* मानुन अविरतपणे  शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेली आहे.
              कमलपुष्पाच्या एकेक पाकळ्या उमलाव्यात आणि त्याचे सुंदर सुगंधी फूल व्हावे अगदी तसेच प्रा.शा. बुधोडा येथील त्यांच्या अल्पशा सहवासात विविध गोष्टींचा जवळून परिचय झाला. 
अध्ययन अध्यापन कौशल्य विकसन कसे करावे...
एक उत्तम उपक्रम संकल्पक कसा असावा..
उत्तोमोत्तम शै. प्रशासन कसे चालवावे...
वेळेचे नियोजन कसे करावे आणि ते कसे पार पाडावे...
नवनिर्मिती/सृजन कसे करावे...
सूत्रसंचालन ,वक्तृत्व कसे असावे...
समाजकार्य करणं,सतत कृतिप्रवण राहणं,नियमित वाचन करून ज्ञानकण जमवणं,समाजातील पिडीत समस्याग्रस्त गरजूंना त्यांची समस्या जाणून मदत करणं... हाच त्यांचा ध्यास राहिलेला आहे. निटनिटके साधे स्वच्छ व प्रामाणिक कसे राहावे.
वक्तशीर, मेहनती,अभ्यासू, टापटीपपणा,संग्रहवृत्ती,ज्ञानपिपासुवृत्ती,काटकसरीपणा,कुटुंबवत्सल,
अजातशत्रू(एकही शत्रू नसलेला)विद्यार्थीप्रिय,समाजप्रिय,सतत कार्यमग्न(शारीरिक आणि बौद्धिक)
व्यासंगी,निसर्गप्रेमी जणू आजच्या काळातील साने गुरुजीच ! सरांचे विद्यार्थी आज भारतातच नव्हे तर परदेशातही डॉक्टर,इंजीनियर,कर्मचारी,अधिकारी म्हणून वावरत आहेत. विशेषत: सरांच्या संपर्कात आहेत. सर जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांनी तन मन आणि धन लावून कार्य केलेले आहे.केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसुन आपले जीवनध्येय समजून त्यांनी शिक्षणसेवा केलेली आहे.
 सरांचे अध्यापन कौशल्य,विषयावरील प्रभुत्व,आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठीची,मुलींबद्दलची आत्मियता मला अनुकरणीय वाटते !
            त्यांच्या सेवेतील कार्याचा मागोवा घेताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की,जिथे जिथे त्यांनी आपली शैक्षणिक सेवा दिली तिथे तिथे त्यांनी कुटुंबासह वास्तव्य करून,गावाला आपलसं करून उत्तोमोत्तम विद्यार्थी घडविले आहेत. शाळेच्या भौतिक सुविधा वाढविण्यासाठी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून,लोकसहभागातून कार्यकाळातील १)सर्वच शाळा डीजिटल बनविल्या आहेत. २) संपूर्ण राज्याला एक आदर्श संगीतमय परिपाठ दिला. ३)राज्याला कव्हा येथून नंदादीप प्रकल्प दिला. ४)औरंगाबाद शै. गुणवत्ता विकास कार्यक्रमात विभागीय आयुक्त मा. व्ही. रमणी साहेब व मा. कृष्णा भोगे साहेबांच्या कार्यकाळात सलग दोन वर्षे (२००७ - ०८ व २००८ - ०९)शाळा विभागात प्रथम आणली. ५)महाराष्ट्र राज्य शै. गुणवत्ता विकास कार्यक्रमात २००९ - १० मध्ये शाळा राज्यात द्वितीय आणली. ६)कव्हा कातपूर धनेगाव शाळेत कार्यरत असताना *निरक्षर विद्यार्थी कळवा व १०००/-रु. मिळवा* असा फलक शाळेसमोर लावला. ७)तसेच S.S.A.योजने अंतर्गत कव्हा येथे- ११, कातपूर -४ आणि धनेगाव येथे -५ वर्गखोल्या दर्जेदार पध्दतीने बांधल्या. ८) *बुधोडा येथे बाला अंतर्गत संपूर्ण शाळाच आतूनबाहेरून वर्गनिहाय,विषयनिहाय आणि अध्ययन निष्पतीनिहाय अतिशय कल्पकतेने रंगरंगोटी करून घेतली. संपूर्ण शाळा डीजिटल,उत्कृष्ट कार्यालय, सुसज्ज ग्रंथालय,अद्ययावत प्रयोगशाळा,स्वच्छ सुंदर शालेयपोषण आहार कक्षाची निर्मिती केली.*
            सरांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून शासनाने आणि विविध सेवाभावी संस्थांनी  पुढील पुरस्कार देऊन त्यांना वेळोवेळी गौरविले आहे.
१) तालुका स्तर आदर्श पुरस्कार २००७ - ०८ 
२)जिल्हास्तर आदर्श पुरस्कार २००८ - ०९ 
३)राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २००९ - १० 
४)डॉ.ना.य. डोळे राज्यस्तरीय पुरस्कार.
५)रोटरी क्लब लातूर मेट्रो,रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांचे Nation Builder पुरस्कार.
६) विविध सेवाभावी संस्थांचे असंख्य पुरस्कार....
 सरांना आजवर मिळालेले आहेत.
            नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. आपले सहकारी,अधिकारी,पालक आणि विद्यार्थीवर्ग... यांच्याप्रती आपुलकीच्या भावनेतून त्यांनी कितीतरी स्नेहाची आपलेपणाची बंधुत्वाची नाती निर्माण केलेली आहेत. सरांचा हा स्नेह एका जेष्ठ बंधूच्या रुपात मलाही लाभला असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते.कारण खूप काही त्यांच्या सहवासातुन मला शिकता आले. बऱ्याचदा अधिकाराच्या पदावर असताना कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी कठोर वर्तन दाखवले असेल परंतु त्यांच्या मनात कुणासाठीही कसलीच कधीही कटुता राहिलेली नाही.सरांच्या निवृत्तीनंतर त्यांची पोकळी आम्हाला आणि विशेषत: बुधोडा गावाला कायमच जाणवत राहणार आहे. 
            आज वयाच्या ५८ व्या वर्षी नोकरीतुन सेवानिवृत्त होतानाही तीच धडपड,तोच उत्साह,तेच सळसळते चैतन्य सरांच्या अंगी कायम टिकून आहे. त्यांच्या या ज्ञानसाधनेचा भावी पिढीसाठी उपयोग व्हावा म्हणून कितीतरी नावाजलेल्या शैक्षणिक संस्थाकडुन सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मागणी आहे.
        आपल्या सेवानिवृत्तीनंतरही १)सेवाभावी संस्थेसाठी अविरत कार्य करणे. २) सरकारी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर असलेल्या प्रचंड अशैक्षणिक कामाचा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होत असलेल्या विपरीत परिणामांचा अभ्यास करून यावर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडणे.  ३) स्वंय अर्थसाय्यीत  शाळेतील  गुणवत्तेचे  पर्यवेक्षण करणे.
 ४) निसर्गप्रेमी असल्याने शेती पशुपालन करणे..... इत्यादी नवीन कार्य हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे.
        यासाठी त्यांनी एका नव्या आयुष्याची दमदार सुरुवात करून ज्या ज्या गोष्टी मागे राहुन गेल्या त्या त्या कराव्यात. ज्यांना वेळ देता आला नाही त्यांना वेळ दयावा.थोडेसे मनासारखे जगून घ्यावे आणि आयुष्याची संध्याकाळ गोड करावी.त्यांचे हे नवे आयुष्य असेच उत्साही निरोगी निरामय जावो या आत्मीय शुभेच्छा !!

*शब्दांकन:- भारत कांबळे,औसा.*

Post a Comment

أحدث أقدم