जागतिक विक्रमासाठी लातूरची सृष्टी जगताप करणार सलग १२६ तास नृत्य !

 जागतिक विक्रमासाठी लातूरची  सृष्टी जगताप  करणार सलग १२६ तास नृत्य !

दयानंद सभागृहात २९ मे  पासून ३ जून पर्यंत सृष्टी करणार सलग नृत्यअविष्कार 



                                            --( लातूर -प्रतिनिधी ) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा  निमित्ताने लातूरच्या सृष्टी जगताप  या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने जागतिक विक्रमात नोंद होण्याच्या दृष्टीने सलग १२६ तास नृत्य अविष्कार सादर करावयाचे ठरवले आहे . या सादरीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली असून दयानंद सभागृहात  हा  सलग नृत्यअविष्कार लातूरकरांना पाहता येणार आहे . जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले आहेत . त्यामुळे सृष्टीच्या नृत्याची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत . या संदर्भांतील  माहिती सृष्टी जगताप हिने स्वतः कुटूंबियांसमवेत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली आहे . लातूर शहरातल्या  अंबिका हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सृष्टी जगताप हिच्या सोबत ,तिचे वडील सुधीर जगताप , आई संजीवनी जगताप  , आजोबा बबन माने , रोहिणी माने ,विराज माकणीकर ,किरण माने , यांची  उपस्थिती होती 
                                     लातूरच्या दयानंद महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या सृष्टी जगताप  हिने वर्ष-२०२१ मध्ये सलग २४ तास नृत्य सादर करीत  आशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये  नोंद केलेली आहे . त्या नंतर आता सलग १२६ तास नृत्य सादर केल्याचा नेपाळ येथील नृत्यांगनेच्या नावावर असलेला विक्रम  ती  मोडायला निघाली आहे . २९ मे  रोजी सकाळी सहा वाजता ती आपल्या नृत्यआविष्काराला सुरुवात करणार आहे . नृत्य सादरीकरण शुभारंभाला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. ,पोलीस अधिक्षक  सोमय मुंडे , जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिनव गोयल  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती सुधीर जगताप यांनी दिली आहे . भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे निमित्य साधून सृष्टीने हा  जागतिक  विक्रम भारताकडे खेचून आणण्याचे ठरवले आहे . यासाठी तिने कठोर परिश्रम करीत सलग १०० तासा  पेक्षा जास्त नृत्य सादर करण्याचे प्रात्यक्षिक अनेकदा केले आहे . यासाठी ती दररोज पहाटे पासूनच  विशिष्ट प्रकारचा व्यायाम करते आहे . सलग पाच दिवस आणि पाच रात्री नृत्य सादर करण्याची मानसिक तयारी तिने  दररोजच्या सरावातून  केलेली आहे . 
                                   सुधीर जगताप आणि संजीवनी जगताप या शिक्षक दाम्पत्याची मुलगी असलेल्या सृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या कल्चरल ऑलम्पियाड साठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते,त्यासाठी ती दुबई आणि हॉंगकॉंग येथील उत्सवात सहभागी झाली होती . यापूर्वी सृष्टीने राज्य आणि देश पातळीवर अनेक स्पर्धेत भाग घेत त्या जिंकल्या आहेत . सृष्टी हि नृत्य विशारद आहे . दहावीला तिला ९९ टक्के गुण  होते . आता ती अकरावी पूर्ण करून बारावीच्या वर्गात जाणार आहे . बारावीच्या अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर ती सलग १२६ तास नृत्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करते आहे .  अभ्यासातही हुशार असलेल्या सृष्टीला भविष्यात यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे आहे .  सृष्टी जगतापची जिद्द पाहून दयानंद शिक्षण संस्थेने सभागृह विनामूल्य उपलब्ध अरुण दिले असल्याचे सुधीर जगताप यांनी सांगितले आहे . 
                                     जागतिक विक्रम असल्याने सृष्टीला संपूर्ण लातूरवासियांनी  उपस्थित राहून प्रोत्साहन  द्यावे अशी विनंती सृष्टी जगताप आणि तिच्या कुटूंबियानी  केली आहे . सलग नृत्य सादर करताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या नियमा प्रमाणेच तिला विश्रांती घेता येणार आहे . एकही चूक झाल्यास ती आपल्या धेय्या पासून दूर होऊ शकते . सृष्टी जगताप सलग नृत्य करणार असल्याने लातूरकरांसाठी दयानंद सभागृह पूर्ण वेळ खुले असणार आहे . मध्यरात्री आणि पहाटे देखील प्रेक्षक रसिकांनी प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . लातूर जिल्ह्यातील आमदार ,खासदार ,आजी माजी लोक प्रतिनिधी यांनीही सृष्टीचा वेळ मिळेल तसे उपस्थित राहून उत्साह वाढवावा असे आवाहन करण्यात आले आहे . 

Post a Comment

أحدث أقدم