आवर्तन संगीत महोत्सवा’ च्या स्वागताध्यक्षपदी दिलीपराव देशमुख

 आवर्तन संगीत महोत्सवा’ च्या स्वागताध्यक्षपदी दिलीपराव देशमुख


लातूर:-  ‘आवर्तन प्रतिष्ठान’ ही संस्था, भारतीय अभिजात संगीत प्रसारासाठी प्रत्येक महिन्याला संगीतसभेचे आयोजन करते. लातूरमधील ह्या संस्थेचा ‘तब्बल नव्व्याण्णव महिने गायन, वादन, नृत्य यांच्या सादरीकरणासह सांगितिक कार्यशाळा, चर्चासत्रे तसेच कलावंतांच्या मुलाखती यांचे आयोजन करणारी संस्था!’ असा नावलौकिक देशभर झाला आहे. 

‘आवर्तन प्रतिष्ठान’ ने पं.सत्यशील देशपांडे यांचे सप्रयोग व्याख्यान, पं. विजय कोपरकर यांचे रागांग पद्धती या विषयावर सप्रयोग व्याख्यान , पंडित राजेंद्र मनेरीकर यांचे पंडित राम मराठे यांची गायकी या विषयावर सप्रयोग व्याख्यान, ध्रुपद गायक श्री आशीष मिश्रा ,भोपाळ यांची कार्यशाळा, नृत्यांगना सौ. मनीषा साठे, पं. राहुल देशपांडे तसेच तंतुवाद्यांची निर्मिती करणारे श्री. माजिद सतारमेकर यांची प्रकट मुलाखत, ध्वनिफिती व दृकश्राव्य माध्यमातून पर्यावरण तज्ञ व ज्येष्ठ रसिक संगीत अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या कल्पनेतून ‘पं. कुमार गंधर्व दर्शन’ असे दर्जेदार कार्यक्रम सादर केले आहेत. रसिकांना व संगीत साधकांना विविध  प्रहरा मधील राग ऐकायला मिळावेत या हेतूने प्रातः कालीन संगीत सभा, मध्यान: कालीन संगीत सभा व सायंकालीन संगीत सभा अशा कार्यक्रमांचे वैविध्यपूर्ण आयोजन केले आहे. रसिकांना व संगीत साधकांना विविध वाद्यांची ओळख व्हावी यासाठी बासरी, सतार,  व्हायोलिन, स्पॅनिशवीणा, संवादिनी, तबला, पखावज व  सुंद्री अशी बहुविध वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना पाचारण केले आहे. 


      जून महिन्याच्या अखेरीस ‘आवर्तन प्रतिष्ठान’च्या मासिक संगीतसभांची शतकपूर्ती होणार असून त्यानिमिताने विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आवर्तन प्रतिष्ठान’ व लातुरातील संगीत रसिकांनी ह्या संगीत महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री व रसिकाग्रणी श्री.दिलीपरावजी देशमुख यांची एकमताने निवड केली आहे. लातूर शहरात संगीत मैफलींच्या आयोजनास सातत्याने प्रोत्साहन देणारे श्री. दिलीपराव देशमुख हे संगीतातील मर्मज्ञ आहेत. त्यांच्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर व विदुषी शोभा गुर्टू आदी महनीय गायकांसमवेत संगीतविषयक चर्चा होत असत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार दोन दिवस आयोजित होणाऱ्या ह्या शतकपूर्ती संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक- वादक-नर्तक यांच्या गायन वादन व नृत्याची मेजवानी लातूरकर रसिकांना ऐकावयास व पाहावयास मिळणार आहे. अशी माहिती  ‘आवर्तन प्रतिष्ठान’च्या वतीने आवर्तनचे मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. जगताप, अध्यक्ष- अभय शहा, सचिव - डॉ.रविराज पोरे, शतक महोत्सवी नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव, प्रा.शशिकांत देशमुख ,प्रा. डॉ.संदीप जगदाळे, प्रा.हरीसर्वोत्तम जोशी व दिनकर पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم