सृष्टी जगतापने रचला इतिहास

 सृष्टी जगतापने रचला इतिहास

लातूर : प्रतिनिधी
आजचा दिवस हा लातूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा होता. कारण केवळ अठरा वर्षाच्या सृष्टी सुधीर जगताप या मुलीने सहा दिवस पाच रात्री या पद्धतीने १२७ तास सलग नृत्य करुन एक नवा इतिहास रचला. ज्या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

यापूर्वी सृष्टीने सलग २४ तास लावणी नृत्य सादर करून रेकॉर्ड ऑफ एशिया बुक मध्ये आपले नाव कोरले होते. यानंतर तिने दहावीमध्ये सुद्धा ९९ टक्के गुण संपादन करुन आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मागील १४ महिन्यांपासून ती अविरत परिश्रम घेत होती. पहाटे तीन वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत योगा प्राणायाम, त्यानंतर आठ ते दहा जिमच्या माध्यमातून फिटनेस प्रोग्राम त्यानंतर डायट, विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या करुन घेतल्या होत्या.

तिने हा डेमो घरामध्ये दोन वेळा करुन घेतला होता. त्याचीच परिणीती म्हणून आज तिच्या नृत्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त तिने देशाला दिलेली ही सुंदर अशा प्रकारची भेट होती. या सहा दिवसात २ तास नृत्य सादर केल्यानंतर केवळ १० मिनिटांची विश्रांती घेत होती. यात ८ मिनिटांची योग निद्रा घेऊन ६ तासांची झोप ती पूर्ण करत होती.

ती सद्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गात शिकत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल खासदार सुधाकर शृंगारे यांनी २ लाख रुपये तर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी एक लाख रुपये पारितोषिक घोषित केले. तसेच दयानंद शिक्षण संस्थेने पाच, सहा दिवस पाच रात्रीसाठी दयानंद सभागृह विनाशुल्क उपलब्ध करुन दिले.

याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमाय मुंढे, उपजिल्हाधिकारी, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते. याबरोबर आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी १ लाख रुपये पारितोषिक घोषित केले.

भविष्यातील स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचा मनोदय तीने व्यक्त केला. याप्रसंगी लातूर शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती बरोबरच हजारो श्रोते उपस्थित होते. लातूरचे नाव जागतिक पातळीवर केल्यामुळे साक्षीवर सर्वत्र अभिनंदन वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم