पत्रकारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातूनच मार्गी लागतात - डॉ. बिडवे

 पत्रकारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातूनच मार्गी लागतात - डॉ. बिडवे


पत्रकार कौटुंबिक स्नेह मेळाव्यास प्रतिसाद 

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - पत्रकार हे समाजाचे‌ सर्व प्रश्न सातत्याने मांडून ते सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पाडतात. मात्र त्यांचे स्वतःचे व कुटुंबियांचे अनेक प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे ते प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येत संघटना स्थापन करुन त्या माध्यमातून शासन व प्रशासन दरबारी मांडल्यास ते प्रश्न नक्कीच मार्गी लागतात, असे ठाम प्रतिपादन धाराशिवचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दि.२५ जुलै रोजी केले.

धाराशिव शहरातील जत्रा फंक्शन हॉलमध्ये व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्यावतीने‌ कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे उद्घाटन तहसिलदार डॉ बिडवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ संदीप तांबारे, व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, व्हॉईस ऑफ मीडिया शिक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे, प्रा. तुषार वाघमारे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ बिडवे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून पत्रकारांनी प्रशासनाबरोबर व्यवस्थित समन्वय ठेवला तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मदत करीत असते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. तर पत्रकार समाज जागृती व समाजातील सुधारणा करण्यासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतात.‌ तसेच पत्रकार व वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनन्य महत्व असून ते खरोखरच अधोरेखित असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रिंट मीडियाचा इलेक्ट्रॉनिक मीडिया असा बदल झाला असून तो बदल पत्रकारांनी स्विकारायलाच हवा असे आवाहन‌ त्यांनी केले. तर डॉ प्रतापसिंह पाटील म्हणाले की, पत्रकार व पत्रकारितेमध्ये डिजिटल मीडिया मोठ्या प्रमाणात वाढला असून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ६७ टक्के महसूल गुगलला चालला असल्याचे त्यांनी नमूद केले. तर पत्रकारांनी स्नेह कुटूंब मेळाव्याचे आयोजन करून आपल्या पत्नीला या कार्यक्रमात सहभागी करून त्यांना आपला पती नेमके काय काम करत आहे याची माहिती करून दिली असल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत केला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पत्रकारितेमध्ये विश्वास जपला जात असून तो विश्वास संपादन करण्याचे काम करावे. विशेष म्हणजे डिजिटल मीडियाचा अंगीकार करणे काळाची गरज असून जो थांबला तो संपला असे सांगत डिजिटल मीडियाचा प्रत्येकाने वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ संदीप तांबारे म्हणाले की, 
पत्रकारांमध्ये असामान्यपण असून पत्रकार आयुष्याला चिमटा घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते लोकशाहीचे वाटसरू झाले असून प्रत्येकांनी आलेल्या संकटावर मात करीत रहावे. मात्र संकट आले म्हणून हार न मानता संघर्ष करीत राहिल्यास आज नाहीतर उद्या त्यातून नक्कीच मार्ग निघाल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्वाळा डॉ. तांबारे यांनी दिला. तर चेतन कात्रे म्हणाले की, देशातील ३३ हजार पत्रकारांपैकी महाराष्ट्रातील ५ हजार ८०० पत्रकारांनी त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक संदर्भात मदतीचे आवाहन केले आहे. अर्ज केलेल्या पत्रकारापैकी ९५ टक्के पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बिकट असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्याकडे याबाबत मागणी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने लवकरच शैक्षणिक संस्थांमध्ये पत्रकारांच्या पाल्यांसाठी आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक पत्रकार आपल्या अडचणी मांडण्यासाठी धजावत नाहीत. तसेच प्रत्येक पालकांनी जागृत राहून यापुढे शैक्षणिक सवलतीसाठी सर्व पत्रकारांनी मदत मागावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच विनोद बोरे म्हणाले की, पत्रकारांना त्यांच्या हक्काचे घर, त्यांच्या पाल्यांना शिक्षण, पत्रकार महामंडळ, पेन्शन, संरक्षण मिळावे यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत देखील पत्रकारांच्या अनेक संघटना होत्या. मात्र त्यामध्ये साप्ताहिक, रेडिओ, टीव्ही चॅनल्स, यूट्यूब व डिजिटल मीडिया आदी पत्रकारांना समाविष्ट करून घेतले नव्हते. मात्र या संघटनेमध्ये या सर्वांना समाविष्ट करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा तुषार वाघमारे म्हणाले की, समाज घटकावर अन्याय अत्याचार झाला तर त्याला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात ते अन्यायग्रस्त पीडितांचा आवाज बनतात. तसेच संचारबंदी, कोरोना, दंगल आदी संकट काळात सर्व समाज घरात असतो. त्यावेळी फक्त पत्रकारच रस्त्यावर बाहेर पडतात असे त्यांनी सांगितले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मते यांनी तर सूत्रसंचालन शरद आडसुळ यांनी व उपस्थितांचे आभार ज्योतीराम निमसे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील साप्ताहिकाचे संपादक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم