मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढणार कृतज्ञता रथ यात्रा
लातूर /प्रतिनिधी -अभाविप मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत निजामाच्या जुलमी राजवटी पासून मराठवाडा मुक्त केला. अशा सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासाठी अभाविप देवगिरी प्रांत कृतज्ञता रथ यात्रा काढणार आहे. दिनांक ०१ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२३ यादरम्यान अंबाजोगाई आणि माहूर अशा दोन शक्तिपीठातून दोन यात्रा निघणार आहेत. या दोन्ही यात्रा मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यातून २५०० गाव, १२०० शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेत नियोजित मार्गात येणारे गाव-शहरात विविध कार्यक्रम, पथनाट्य, पत्रक वाटप, जाहीर कार्यक्रम, संस्कृतिक कार्यक्रम, विषय मांडणी, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. अंबाजोगाई ते छत्रपती संभाजीनगर या यात्रेचा प्रवास एकूण १४८१ किलोमीटर होणार असून माहूर ते छत्रपती संभाजीनगर या यात्रेचा प्रवास १५२८ किलोमीटर होणार आहे. यासाठी दोन स्वतंत्र रथ व चार चाकी वाहने आणि कार्यकर्ते सोबत असणार आहेत. रथामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा स्तंभ व कलश असणार आहे. कलशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा दिला गेला अशा ठिकाणाहून एक मूठ माती घेऊन ती त्या कलशात टाकली जाणार आहे. *नमन करो इस मिट्टी को* या स्वरूपात पवित्र मातीचा कलश देखील संपुर्ण मराठवाड्यात मार्गक्रमण करणार आहे. दिनांक १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये ही यात्रा सर्व तालुक्यांमध्ये मार्गक्रमण करणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी या यात्रेचा समारोप सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपात होणार आहे. अभाविप मराठवाड्याच्या भूमिपुत्रांना या यात्रेत मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. या यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन डॉ संदीपान जगदाळे व स्वागत अध्यक्ष एडवोकेट आशिष वाजपेयी यांनी केले याप्रसंगी जिल्हा संयोजक प्रणव सगर, महानगर मंत्री सुशांत एकोर्गे यांनी केले. याप्रसंगी प्रणव कोळी,अक्षय स्वामी, नरेंद्र ठाकूर उपस्थित होते.
إرسال تعليق