बदलत्या सामाजिक परिस्थितीत मानसिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे - साक्षी सारडा
लातूर/प्रतिनिधी:आज सामाजिक परिस्थिती दररोज बदलत आहे.याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असून यातून होणाऱ्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे, असे मत साक्षी सारडा यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित साप्ताहिक बैठकीत "मानसिक आरोग्य" या विषयावर अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या साक्षी सारडा मार्गदर्शन करत होत्या. मानसशास्त्रात पदवी प्राप्त केलेल्या साक्षी सारडा अमेरिकेत एम.एससी. काउन्सिलिंगची पदव्युत्तर पदवी घेत आहेत. याशिवाय कानपूर आयआयटीमधून सामाजिक शास्त्र या विषयावर त्यांनी संशोधनही केलेले आहे.या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ.सुबोध सोमाणी व लितेश शहा यांच्यासह विद्यमान अध्यक्ष रवींद्र बनकर, सचिव किशोर दाताळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना साक्षी सारडा म्हणाल्या की,मानसिक आरोग्य कायम राखण्यासाठी स्वतःची क्षमता ओळखता आली पाहिजे.जीवनात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या तणावाशी जुळवून घेता आले पाहिजे.सतत शिकत राहून येणाऱ्या अनुभवांचा जीवनात वापर करणे शक्य झाले पाहिजे. आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
मानसिक आरोग्य हा आज अत्यंत ज्वलंत विषय आहे.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या तर त्यातून याची प्रचिती येते.वाईट सवयींमुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते.या सवयींपासून दूर रहायला हवे.तणावाचे नियोजनही करता यायला हवे.आज विविध शारीरिक व्याधी, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आलेला एकाकीपणा, जीवघेणी स्पर्धा यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे.ते बिघडू द्यायचे नसेल तर स्वतःच्या गरजा कमी करायला हव्यात. नियंत्रित पद्धतीने जगता यायला हवे.प्रत्येकाने आपण का जगतोय ? याचा विचार करावा. जगण्याचा हेतू सकारात्मक असेल तर मानसिक तणाव कमी होतो.तणाव कमी करण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून घ्यावे.मन मोकळे करता यावे असे मित्रही असावेत.एकदम आनंदी होणे किंवा दुःखी होणे,चिडचिड निर्माण होणे,झोप न येणे किंवा जास्तीची झोप येणे ही मानसिक आरोग्य बिघडल्याची काही कारणे असल्याचे त्या म्हणाल्या. अशा स्थितीत मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मेडिटेशन हा देखील त्यासाठी एक चांगला उपाय असल्याचेही साक्षी सारडा यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रोटरी परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.प्रारंभी श्रवण बियाणी यांनी सारडा यांचा परिचय करून दिला तर दिनेश सोनी यांनी आभार प्रदर्शन केले.उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची सारडा यांनी उत्तरेही दिली.
إرسال تعليق