आयएमए, डेंटल, निमा, होमिओपॅथी असो. व व्हीडीएफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आयएमए, डेंटल, निमा, होमिओपॅथी असो. व व्हीडीएफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी लातूर शहर व जिल्ह्यातील तब्बल २२५ हॉस्पिटल्समध्ये आयएमए, डेंटल, निमा, होमिओपॅथी असो. व व्हीडीएफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. रुग्णांना मोफत औषधींचेही वितरण करण्यात आले. 
                 या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ९५ हॉस्पिटलसह जिल्हाभरातील एकूण २२५ हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपआपल्या परिसरातील गरजू रुग्णांची सोय व्हावी, त्यांना योग्य ती उपचार यंत्रणा उपलब्ध करून देणे सुखकर व्हावे याकरिता शिबिराच्या आधीपासूनच रुग्णांना त्याविषयी सविस्तर माहिती देण्याचे काम केले होते. शिबिराच्या आधी चार दिवस एखादा रुग्ण उपचारासाठी आला असेल व त्याचा उपचाराचा खर्च अधिक होत असेल तर लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी अशा रुग्णांना मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते, हे विशेष. यावरून लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच डॉक्टरांच्या मनात , हृदयात दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्याप्रती किती आदराची भावना आहे ते लक्षात येते. आपल्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचाही त्यांनी पदोपदी विचार केल्याचे यावरून निदर्शनास येते. 
      लातूर शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या महाआरोग्य शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपूरे , उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कर्पे , डॉ. सतीश पडगीलवार, निमाचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख, डॉ. मनोज कदम, होमिओपॅथिक असो.चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी परिश्रम घेतले. या महा आरोग्य शिबिरामध्ये निःशुल्क वैद्यकीय सल्ला व विविध तपासण्यांवर २५ ते ५० टक्के सूट देण्यात आली होती. यामध्ये अस्थिरोग, दांत रोग, हृदयरोग, पोट विकार, मधुमेह, नेत्रचिकित्सा, रक्त तपासणी, एक्सरे, डिजिटल एक्सरे, इसीजी यांसह सर्वच व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी - उपचार करण्यात आल्याचे आयएमए चे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी सांगितले. यावर्षी किमान २०० हॉस्पिटल्समध्ये हा आरोग्यदायी उपक्रम राबविला जाईल अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात हा आकडा २२५ पर्यंत गेल्याने त्याचा रुग्णांनाही चांगलाच फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले. डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कर्पे यांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ हजारोंच्या संख्येने दंतरोग्यांनी घेतल्याचे सांगितले. निमाचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख, होमिओपॅथिक असो.चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक यांनीही या शिबीरांमुळे रुग्णांतूनही अतिव समाधान व्यक्त झाल्याचे सांगितले.
 डॉ. अशोक पोद्दार यांनी याविषयी माहिती देताना आज लातूर शहर व जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे, याचे सर्व श्रेय अर्थातच दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रातही एक आगळा वेगळा आरोग्यसेवेचा लातूर पॅटर्न उदयास येऊ शकल्याचे डॉ. पोद्दार यांनी नमूद केले. 
  या महाआरोग्य शिबिराचा लाभ लातूर शहर व जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने गरजू नागरिक व रुग्णांनी घेतल्याने शिबिराचा उद्देश्य सफल झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. शिबिरात सहभाग नोंदविलेल्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचे विलासराव देशमुख फाऊंडेशन , आयएमए लातूर, डेंटल असोसिएशन लातूर, निमा असोसिएशन लातूर, होमिओपॅथिक असोसिएशन लातूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत. या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेतलेल्या अनेक रूग्णांनीही विलासराव देशमुख यांनी हयात असताना सामान्यांची काळजी घेतली आणि आज आपल्यात नसतानाही अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपली काळजी घेत असल्याच्या भावना अंतःकरणातून व्यक्त केल्या.

Post a Comment

أحدث أقدم