औशाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचा फोनवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा

औशाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचा फोनवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा 
औसा - लातूर जिल्ह्य़ात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिक हातची जाण्याची वेळ आली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवावे, तर महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही.याबरोबर महावितरण कडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नसून या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि.३१) रोजी आयोजित केलेल्या औसा येथील महावितरण च्या बैठकीत मांडली. हे ऐकून आ. अभिमन्यू पवार यांनी बैठकीतूनच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीतूनच फोन लावला.यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन असा सज्जड दम दिला. 
  महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्य़ातील पिकांची परिस्थिती बिकट झाली असून औसा विधानसभा मतदारसंघातील या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी गुरुवारी औसा येथे महावितरणचे अधिकारी व सरपंच यांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, निलंगा येथील अभियंता जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी बैठकीतूनच थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावून फोन महावितरणच्या अधिकाऱ्याला देत सभागृहातील माईकवरून देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्याचे संभाषण सगळ्या सभागृहाला ऐकवले. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे अजून मनस्ताप करण्याची वेळ येत असल्याचे कळताच उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलाच दम भरत शेतकऱ्यांना जर कुठला अधिकारी अडचणीत आणत असेल तर त्याला निलंबित करेन. पाऊस नाही, पिके सुकून जात आहेत, शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न सतावत असतांना भविष्यातील उपाययोजना तर तुम्ही राबवाच पण तात्काळ उपाययोजना करून वीज वितरण सुरळीत सुरू करा. या कामांमध्ये जर कोणी हयगय करीत असेल तर तुम्हा सर्वांनाच मी घरी पाठवेन`, असा दम फडणवीसांनी फोनवरून दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री संवेदनशील
दरम्यान आज झालेल्या बैठकीत शेतकरी व सरपंच यांच्या तक्रारी लक्षात घेता आ. अभिमन्यू पवार यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना सर्वासमोर फोन करीत समस्यांचा पाडा वाचला तसेच महावितरण कडून शेतकऱ्यांना होणारा त्रास निर्देशनास आणून दिला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर संवेदनशील राहून शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा कसल्याही तक्रारी समोर आल्या तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा दिला. सदर दुष्काळाची दाहकता लक्षात घेता उपमुख्यमंत्री याबाबत किती गंभीर आहेत हे दिसून येते. 
जिथे कमी दाबाने वीजपुरवठा होतोय तिथे उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी अतिरिक्त क्षमतेच्या रोहित्र बसविण्यात यावे जेणेकरून शेतीला उच्च दाबाने वीजपुरवठा होईल. मतदारसंघात सुरळीतपणे वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने नवीन वीज उपकेंद्राची निर्मिती केली जात आहे.तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र रोहित्रीसाठी आमदार फंडातून रोहित्री दिल्या जात असून सुरळीतपणे वीजपुरवठा बाबत आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले..

Post a Comment

أحدث أقدم