सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला होणार!

सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला होणार!
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून शिवसेनेच्या आंदोलनाची दखल : लवकरच मुंबईत बैठक
लातूर : सोयाबीन संशोधन केंद्र परळीला जाहीर केल्यानंतर लातूरमधून शिवसेनेच्यावतीने उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियानंतर अखेर सोमवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र होण्यासाठी आठ दिवसात मुंबईत बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले. याबाबत कृषीमंत्री मुंडे यांचे विशेष कार्य अधिकारी पंडीत खर्डेकर यांनी शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांना तात्काळ पत्र पाठविले आहे.
लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हावे; अन्यथा कृषीमंत्र्यांचे कार्यक्रम जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशारा सोमवंशी यांनी दिला होता. लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र उभारले जाईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यावेळचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती. त्यानंतर कृषी मंत्री पदी आलेले अब्दुल सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारले जाईल, असा दुजोरा दिला होता. मात्र कृषी मंत्री पदावर धनंजय मुंडे आल्यानंतर लातूरला होऊ घातलेले सोयाबीन संशोधन केंद्र तसेच देवणी गोवंश संशोधन केंद्र अनुक्रमे परळी व अंबाजोगाईला उभारण्याची घोषणा गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे केली.
 या घोषणेचे तीव्र पडसाद लातूर जिल्ह्यात उमटले विशेषत: शिवसेनेच्यावतीने राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी पुढाकार घेत सोयाबीन संशोधन केंद्रावर लातूरचा हक्क आहे, असा दावा करीत पहिल्यांदा लातूर बाजार समितीतील आडत बाजार बंदची हाक दिली. त्यास लातूरच्या व्यापाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला त्यानंतर औराद, निलंगा, अहमदपूर व औसा या बाजार समितीचे आडत बाजार हे सोयाबीन संशोधन केंद्राच्या मागणीसाठी शिवसेनेने बंद ठेवले. शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांनी आडत बाजार बंदच्या या आंदोलनात बोलताना लातूर हे सोयाबीनचे हब आहे. देशात सर्वाधिक सोयाबीन पिकवणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. त्यामुळे लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र तात्काळ उभारावे; अन्यथा लातूर जिल्ह्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर सोमवारी धनंजय मुंडे हे लातूर दौऱ्यावर आले होते. मुंडे यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ मुंबईला नेण्यासाठी ते खाजगी विमानाने आले होते. परळीहून लातूरच्या विमानतळाकडे निघताना त्यांना शिवसेना सोयाबीन संशोधन केंद्राबाबत आंदोलन करणार असल्याची कुणकुण लागली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांना फोन करून आपण आई आजारी असल्याने खाजगी विमानाने तातडीने मुंबईला निघालो आहोत. कृपया आपल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. कृषिमंत्री म्हणून लातूरला संशोधन केंद्र देण्याबाबत आपली भूमिका सकारात्मक आहे. येत्या आठ दिवसात याबाबत आपण मुंबई येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे आपण आंदोलन व घोषणाबाजी करू नये, आपल्या मागण्यांच्या निवेदनाचा मी स्वीकार करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर संतोषभाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अंबाजोगाई रोडवरील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयासमोर कृषिमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहर प्रमुख रमेश माळी, रमेश पाटील, विलास लंगर, शिवकुमार तोंडारे, सुरेश मुसळे, तानाजी करपुरे, अजित सोमवंशी, अनंत जगताप, त्र्यंबक स्वामी, सिद्धेश्वर जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم