बहुसांस्कृतिक विकासासाठी अनुवादित साहित्याची गरज - डॉ.राजशेखर सोलापुरे

बहुसांस्कृतिक विकासासाठी अनुवादित साहित्याची गरज - डॉ.राजशेखर सोलापुरे
लातूर - आजचे जग हे एका विशिष्ट संस्कृतीचे जग राहिले नाही.आज जगातील सर्व समाज व देशात सांस्कृतिक व वैचारिक देवाणघेवाण होत आहे.बहुसांस्कृतिक विश्वाची निर्मिती करण्यासाठी अनुवादित साहित्य हे गरजेचे आहे.विचारांचे अभिसरण होण्यासाठी इतर भाषेतील साहित्य आपल्या मातृभाषेत अनुवादित झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.
शब्दांकित साहित्य मंच आणि जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय आयोजित शीला बरडे-रणसुभे अनुवादित रत्नकुमार सांभारिया लिखित 'मियाॅंजानची कोंबडी आणि इतर कथा' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते भाष्यकार म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नागनाथ कुंटे हे होते तर याप्रसंगी प्रा. सुशीला पिंपळे, अनुवादिका शीला बरडे-रणसुभे,प्रा. केशव अलगुले, प्रा.नयन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.राजशेखर सोलापुरे म्हणाले की, समाजातील पुरोहितशाही आणि राजकारणातील सरंजामशाही जोपर्यंत संपुष्टात येणार नाही तोपर्यंत सामाजिक जीवनाची प्रगती होणार नाही.मियाॅंजानची कोंबडी आणि इतर कथा या पुस्तकातून जाती जाणीवांचा पट विस्ताराने मांडला आहे तसेच स्त्रियांच्या प्रश्नांचा आणि विश्वाचा वेध घेण्यात आला आहे. व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा विचार समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी या कथा मोलाची भूमिका बजावतात. धर्म,समाज,नातेसंबंध, राजकारण आणि शेती विषयक प्रश्नांची मांडणी करत नव्या समाजाचे चित्र या अनुवादित पुस्तकातून रेखाटले आहे.
याप्रसंगी बोलताना प्रा. सुशीला पिंपळे म्हणाल्या की, शिक्षणामुळे माणसाची स्थिती बदलते याचे चित्रण या कथेच्या पुस्तकातून करण्यात आले आहे. वृद्धांचे प्रश्न मांडत असताना या कथा व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करतात. अध्यक्षीय समारोपात डॉ. नागनाथ कुंटे म्हणाले की, अनुवादाचे कार्य कठीण असते. अनुवादकाला दोन्ही भाषांचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते.
याप्रसंगी प्रा.नयन राजमाने यांनी शीला बरडे-रणसुभे यांची मुलाखत घेतली. तसेच डॉ. सतीश यादव आणि डॉ.रणजीत जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मीना घुमे यांनी केले. 
कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सूर्यनारायण रणसुभे, हरिती वाचन चळवळीचे मार्गदर्शक डॉ. अनिल जायभाये,पांडुरंग अडसुळे, संजय जमदाडे, रामदास कांबळे, नरसिंग इंगळे,प्रा. गोविंद जाधव, विजया भणगे,विमल मुदाळे, रजनी गिरवलकर, वृषाली पाटील, शैलजा कारंडे, हनवते, तहेसीन सैय्यद, सत्यशीला कदम,उर्मिला भांदरगे, ललिता कुंटे, सास्तुरकर, डाॅ.सुरेखा बनकर, सविता धर्माधिकारी, प्रा. सुलक्षणा सोनवणे ,सुलोचना मुळे,रमेश हनमंते,सुरेश गीर'सागर', सुभाष रणखांब,प्रा.रामकिशन सम्मुखराव इ.अनेक 
रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم