हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय दुष्काळी परिस्थिती हटणार नाही- आ.कराड

 
हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय दुष्काळी परिस्थिती हटणार नाही- आ.कराड
       लातूर - लातूर जिल्हा कायम दुष्काळाशी सामना करतोय सातत्याने कमी, जास्त पाऊस होत असल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यासह सर्वांनाच अडचणींना तोंड द्यावे लागते. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेले जलसाक्षरता अभियान अत्यंत महत्त्वाचे असून जोपर्यंत लातूर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळणार नाही तोपर्यंत आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही, कायमचा दुष्काळ हटणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ,. रमेशआप्पा कराड यांनी केले.

        समुद्रात वाहून जाणारे हक्काचे पाणी लातूर जिल्ह्याला मिळावे यासाठी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या जलसाक्षरता रॅलीचा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात प्रवेश होताच भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर रेणापूर आणि खरोळा येथील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार स्वागत केले.

        पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी लातूर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे त्याशिवाय भवितव्य नाही. याबाबत जिल्ह्यातील जनतेत जनजागृती व्हावी जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संपूर्ण जिल्हाभर बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रवास करत आहेत. या रॅलीत ५०० ते ६०० बाईकस्वार सहभागी झाले होते.

         अहमदपूर, चाकूर तालुक्याचा प्रवास करून रेणापूर तालुक्यात रँलीने प्रवेश करताच खरोळा येथे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर ग्रामीण मतदार संघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. रेणापूर आणि खरोळा येथे जलसाक्षरता रॅलीचा जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. भविष्यात होणारे तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होईल. मराठवाडा आणि त्यातही लातूर जिल्ह्यात तर आजच महायुद्धासारखी परिस्थिती आहे. जिल्हा पाण्यासाठी स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. भविष्यात ओढवणारे संकट ओळखून जलसाक्षरता अभियानात सहभागी व्हा. पाण्यासाठी होणारे तंटे थांबविण्यासाठी साथ द्या, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.

          यावेळी बोलताना आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, मराठवाड्याचा अमृत महोत्सव नुकताच आपण साजरा केला. गेल्या ७५ वर्षात आपण अनेक गावांना शहरांना पिण्याच्या पाण्याची सोय करू शकलो नाहीत. ही शोकांतिका आहे संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. कधी पाऊस जास्त होतो तर कधी कमी होतो त्यामुळे पिकाचे सातत्याने नुकसान होत असून बारमाही शेतकऱ्यांसाठी पाणी मिळाले पाहिजे. संभाजीरावांनी हाती घेतलेले हे अभियान सर्वांच्या भवितव्याच्या हिताचे असून मराठवाड्याचा लातूर जिल्ह्याचा मागासलेपणा घालविण्यासाठी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. त्याशिवाय आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही. संभाजीराव निलंगेकर यांनी सुरू केलेल्या या अभियानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष करावा असेही आ. कराड यांनी बोलून दाखविले.

          यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील, भाजपाचे अरविंद पाटील निलंगेकर, विक्रमकाका शिंदे, अमोल पाटील, संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल भिसे, सतीश आंबेकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, सांगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, दत्ता सरवदे यांच्यासह रेणापुर खरोळा येथील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व स्तरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم