जगण्यातील सामर्थ्य व सहवास म्हणजे माझा जिवलग मित्र प्रा. डॉ. महेश मोटे

जगण्यातील सामर्थ्य व सहवास म्हणजे माझा जिवलग मित्र प्रा. डॉ. महेश मोटे
शाळेतील अविस्मरणीय क्षण.....                          
वाचनातून लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. आजच्या युगात विचाराप्रमाणे आचरण करून व्यक्त होणे दुरापास्त होत आहे. पण माझा मित्र सामर्थ्य संपन्न व प्रभावशाली बनण्यासाठी आयुष्यातील महत्वाचा वेळ देतो आहे आणि तो आपण दिला पाहिजे. या उदात्त हेतूने आपण इतरांना वेळ देत आहात आणि देतच राहू असे मानुन. याबाबत एकनिष्ठ असलेली आपली मानसिकता ती आपल्याला व इतरांना यश मिळवून देऊ शकते. सतत कर्तव्यनिष्ठ राहून समाजातील आडल्या-नडल्यांना मदत करणे हा स्वभाव गुणधर्म. अभिमान हा कशाचा असावा तर आपल्या स्वकर्तुत्वाचा असावा तेच स्वकर्तृत्व आपल्याला एक प्रतिष्ठा मिळवून देते. ती प्रतिष्ठा क्षणाक्षणाला आनंद, आत्मानंद, सुख देते. त्यामुळे जगण्याची इच्छा आणखीनच बळावत जाते, बरेच लोक पैशाचा संचय करतात. श्रीमंतीची प्रतिष्ठा, गर्व, अहंकार आणि दरारा निर्माण करून जनमाणसात आपली  आबाशी प्रतिमा निर्माण करतात पण वस्तुतः ते चिरकाल टिकू शकत नाहीत. यामध्ये कोण जिंकले आणि कोण हरले हे महत्त्वाचे नाही. ते स्वतः वाचन करुनच अनुभव घ्यावा लागतो. अनुभवासारखा दुसरा कुठलाच मोठा गुरु नसतो. मग कुठलेही काम असो, कामांमध्ये अधिक प्रगती करण्यासाठीचा केलेला प्रयत्न, ती व्यक्ती समाजाला काहीतरी देणारी,  समाजातील सर्व नियम पाळून आणि समाजाचे  कल्याण करण्यासाठी आयुष्याचा एक-एक क्षण जी व्यक्ती खर्च करते. ती खरी आदर्श व्यक्ती असते. तिलाच समाजात मानसन्मान मिळतो. असाच हा सन्मान देताना मनातल्या उपजत आनंदी भावना उत्कंठाला गेल्या. माझा स्नेही मित्र प्रा. डॉ. महेश मोटे यांना माझ्या शाळेतील मुलांसमोर आणावयाचे म्हणून निमंत्रण देण्याचे ठरविले. पाहुण्यांना बोलवावयाचे म्हटल्यावर मुलांनी स्वतः त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हाट्सअपवरुन आमंत्रित केले. त्या आमंत्रणाला सरांनी सन्मानपूर्वक होकार देऊन शाळेतील मुलांची मानसिकता, आरोग्यविषयक काळजी आणि विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कमतरता म्हणजे आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द, वेळेचा सदुपयोग आणि अंतर्मन पारखण्याबाबत उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन डॉ. महेश मोटे यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे करुन दिले. आपल्या ज्ञानरुपी विचार मंथनातून व आचारातून त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांचे व्यक्तिमत्व कसे घडते, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपले आदर्श कोण असायला पाहिजेत. सर बोलताना मुले भान हरवून एकाग्र होऊन एक-एक विद्यार्थी त्यांच्या या कृतीला उत्तम प्रतिसाद देऊन सहभागी होत होता. सरांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सहजगत्या विद्यार्थी देत होते. शाळेतील इयत्ता पहिली दुसरीच्या कुमारी गौरी परिहार व आरोही कललुरे हिने मोटे सरांचा शाल, पुष्पहार घालून केलेला सन्मान म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरस्कारा एवढाच सन्मान असल्याचे जाणवत होते. कारण शुद्ध अंतकरणाच्या व्यक्तींनी केलेला सत्कार आणि पोट भरावे म्हणून प्रेमळ मनाने केलेला स्वयंपाक त्या भगिनीचा प्रयत्न म्हणजे खरच अन्नपूर्णा म्हणावे लागेल. सूत्रसंचलन इयत्ता पाचवी मधील दुर्गा मोरे आणि इयत्ता सातवीची मधुरा चव्हाण हिने केले. तसे सूत्रसंचलन या वयात मुले करतात याचे कौतुक कोणत्या शब्दात करावे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती ही कायमची निघून जाते. इतके याबाबत सांगता येईल. प्रास्ताविक इयत्ता तिसरीच्या  प्रणाली मोरे व संदीप परीहार तर पाहुण्यांचा परिचय मयुरी  परीहार व सई मोरे हिने करताना बोलण्याची लकब पाहून अचंबित झाले. असंच या मुलांच्या बाबतीत ही म्हणावेसे वाटते. मुलांच्या बाबत वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. या वयात त्यांच्या स्वभावात परिवर्तन होत आहे. याबाबतीत थोड्याशा मर्यादा आपण बाळगतो पण त्यांची सृजनशीलता ओळखून मुलांसोबत सुसंवाद करणारे श्री. महेश मोटे सर आमच्या शाळेत तुम्ही आल्याबद्दल आम्हाला आभार कसे मानावे हेच कळत नाही, कोणत्या शब्दात तुम्हाला बोलायचे ? एक मात्र बोलावं वाटतं विद्वत्ता वाचनाने तुम्हाला आली, तुम्ही ती प्राप्त करून घेतली. वाचनामुळे तुमच्यात आलेला आत्मविश्वास, अनुभव, वाढलेले तुमचे अनुमान, तर्क काढण्याच्या पद्धती, विद्वत्तेमुळे इतरांना सुखी करण्याची एक मानसिकता, सुखमय पद्धत आणि सहवासातून आनंद देत जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मौल्यवान गोष्टी तुमच्यात असल्याचे दिसून येत होते. त्या इतरांना सुद्धा वाटण्याचं कौशल्य, देण्याचा स्वभाव तुमच्याकडून घेण्यासारखा आहे. प्रामाणिकपणाने एक गोष्ट बोलाविशी वाटते की, खरंच ईश्वराने तुमच्यासारखी माणसे निर्माण केली. त्यामागची भूमिका कोणती हे तुमच्यासारखी माणसं सहवासात येऊन गेल्यानंतर कळतं की, खरंच ईश्वर हा मोठ्या हुशारीने आणि प्रेमाने जग चालवतो. तुम्ही आल्यानंतर मुलांनी तुमच्या बाबत तोंडी व स्वलिखित प्रतिक्रिया दिल्या. बरीचशी माणसे हुशार, पैसेवाले, स्वार्थी किंवा आणखीन कोणत्या तरी सुख वस्तूच्या मोहात असतील तर त्याचा भोग घेण्यासाठी म्हणून स्तुती सुमने गात असतील. परंतु कदाचित ही स्तुती सुमने तुम्हाला वाचताना वाटून जातील पण गंभीर गोष्ट मन खंबीर करूनही वाचन करावे. कारण तुमच्या वास्तविक रूपाचं हे शब्दांकन आम्ही केलेलं आहे. मी तुमचा मित्र पवळे अंगद पांडुरंग मला खूप दिवसापूर्वी असं वाटलं की, आपण इकडे यावं. कामकाजाच्या गुंतागुंतीमध्ये सवड नावाचा शब्द तुमच्याजवळ नव्हता. खरंतर सवड नावाचा शब्द सापडणे हे आपल्यासारख्या जवळ आमचं नशीबच म्हणावे लागेल. कामाच्या रूपाने आपण सतत व्यस्त असता. वेगवेगळ्या उपक्रमाचे नियोजन करत राहणे, सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणे हे तुमच्या आयुष्याचे समीकरण व जगणे ठरत आहे. ईश्वराला देखील सृष्टी चालवताना अपयश आले असेलच पण त्यांच्याकडूनही आपण कोणता आदर्श घेतो. तुमचे ते वाचन, तुमच्या त्या वाचनातील संकल्पना आम्हाला भारावून ठेवलेल्या आहेत. पुन्हा एकदा आमंत्रित करावं आणि आमच्या शाळेचं वैभव तुम्ही पहावं. तुम्ही आमच्या शाळेचे वैभव पाहिलं पहिली ते आठवी पर्यंतची प्रत्येक मुलं कार्यक्रमात सहभागी होती. त्यांना इंग्रजी ही उत्कृष्टपणे शिकवण्याचं, बोलण्याचं कौशल्य येतं. हे पाहून तुम्ही अत्यंत आनंदी झालात. पण आम्हाला आणखीन आपल्या सहवासाची गरज आहे आणि वाटते. कधी-कधी असं होऊन जातं. एक माणूस सहवासातून पुढे गेल्यानंतर तो पाठीमागे पूर्ण बघत नाही. पण आमच्या शाळेतील गरीब जिल्हा परिषद, चलबुर्गा शाळेतील मुले कोणत्या बाबतीत कमी आहेत ? तीच बाब तुम्ही देऊन गेलात. त्यामुळे आम्ही आज इथेच श्रीमंत झालो. ज्ञानाचं वैभव, ज्ञानाची संपत्ती, संस्काराची संपत्ती ओझरते का होईना तुम्ही बोलून गेलात. पण तुमच्या एका बोलण्याने आमचं हे सगळं मन भरून गेलं आहे. खूप काही बोलावं आणि संवाद साधावा असं वाटतं पण इतर गोष्टी, कामे, मित्रपरिवार व कर्तव्य पार पाडताना तुम्ही नेहमी-नेहमी आमच्या नजरेसमोर राहाल. त्याचे एकमेव कारण म्हणजे  आत्मसन्मान खूप किंमती असतो, तो मूल्यवान बनवण्यासाठी गाठी-भेटी, नव्या-जुन्या विचारांची देवाण-घेवाण, सुसंस्कार, नीतिमूल्य त्यासाठी हसू हे आपल्याकडून मागून घेऊन आमच्या मुलांना देणं. ही तुमची देण्याची प्रवृत्तीच मुलांना वैभव प्राप्त करून देईल. थोडक्यात काय तर नामदेव पायरीचा दगड असतो तो तुम्ही बनलात. आमचे कान होते आपल्या  बोलण्याकडे, समजूतदार माणसाचा मेंदू चालतो आणि मूर्ख माणसाची जीभ चालते.  वाचन आणि संस्कार या पिढीला खूप गरजेच्या गोष्टी आहेत. परत आपण एकदा आमच्या शाळेत येऊन मुलांना पुनः ऊर्जा व प्रेरणा द्यावी, यासाठीच आपल्यासारख्या व्यक्ती महत्वाच्या वाटतात ? कारण भावना, प्रेम व स्नेह या जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात. मुलांमध्ये आदरयुक्त भीती, वडीलधारी मंडळींचा सन्मान, संशयवृत्ती बाळगू नये, कुणाच्या तरी पाठीमागे निंदा करू नये. या वाईट प्रवृत्ती या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन संकोचीतवृत्ती, न्यूनगंड, वाढत्या अपेक्षा, गैरसमज निर्माण होऊन मित्र-मैत्रिणींमधील संबंध बिघडतात. ते बिघडू नयेत म्हणून ऋणानुबंध कायम ठेवणे महत्त्वाचे असते. कोणत्याही वाईट बाबींचा ताणतणाव माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ नये. पाणी आणि वाणी वाया जाऊ नये, असे मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो. आपल्या येण्यामुळे मुलांमध्ये आदरयुक्त भाव, आत्मविश्वास, उत्साह, स्नेहयुक्त ऋणानुबंध काय असतात याची जाणीव करून दिलात. आपण मार्गदर्शन करताना ज्ञानरुपी शब्द वापरण्याचे कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होते. याची प्रचिती देखील आम्हास आली. अशा उपक्रमामुळेच मुले आत्मविश्वासाने त्यांच्या जीवनात यश संपादन करू शकतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक जी. डी. सुडके होते. यावेळी पी. डी. उबाळे, के. एस. बिराजदार, एन. व्ही. गावकरी, होळकर, व्यंकट चव्हाण आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार मंथन जाधव या विद्यार्थ्यांने मानले. शेवटी सर आपणास दीर्घायुष्य लाभो व आपल्या पुढील कार्यास आमच्या विद्यार्थी, शिक्षकवृंद, सहकारी मित्र व  गावकऱ्यांकडून मनःपूर्वक सदिच्छा !               शब्दांकन : तंत्रस्नेही सहशिक्षक पवळे अंगद पांडुरंग                                   जिल्हा परिषद शाळा, चलबुर्गा, ता. औसा, जि. लातूर                                     संपर्क क्र. ७५८८२०५३९१

Post a Comment

أحدث أقدم