एचआयव्ही संक्रमितांना समाज, कुटुंबाने स्वीकारावेः न्या. कोसमकर

 एचआयव्ही संक्रमितांना समाज,

कुटुंबाने स्वीकारावेः न्या. कोसमकर

सेवालयात जोडप्यांच्या पाच खोल्यांचे लोकार्पण
लातूर ः कोणतीही चूक नसताना जन्मतःच भाळी आलेल्या एचआयव्ही संक्रमित शिक्क्यामुळे चिमणी-पाखरांचे आयुष्य बेचिराख होत आहे. त्यांचे आई-वडील लहानपणीच पोरके करून जातात, या अनाथांचा सांभाळ करण्यास नातेवाईकही पुढे येत नाहीत, यामुळे सेवालयासारख्या सामाजिक संस्थांची गरज भासते.एचआयव्ही संक्रमितांकडे बघण्याचा समाज व कुटुंबाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी येथे केले.
जागतिक एड्स निर्मूलनदिनानिमित्त शुक्रवार, १ डिसेंबर रोजी हासेगाव येथील सेवालयात विवाह झालेल्या एचआयव्ही संक्रमित जोडप्यांसाठी देणगीतून बांधण्यात आलेल्या पाच खोल्यांचे लोकार्पण न्या. कोसमकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सेवालयातील मुलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी सेवालयाचे प्रमुख प्रा. रवी बापटले, लातूर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख, हासेगावचे शांतेश्‍वर मुक्ता, उपसरपंच नीलेश आडे, मारुती मगर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष इनूस बोपले, सतीश जेवळे, प्रणील नागुरे, खय्यूम शेख, राजकुमार महाशेट्टे, सेवालयाचे प्रकाश आडे, शिवकांत बापटले, रचना बापटले यांची उपस्थिती होती.
न्या. सुरेखा कोसमकर म्हणाल्या, कोणताही दोष नसताना या चिमणी-पाखरांना एचआयव्ही संक्रमित होऊन जन्म घेण्याची वेळ आली. त्यांच्या बालपणातच आई-वडीलांचे छत्र हरवले. अशा बालकांना कुटंब, समाजाने वाळीत टाकले तरी प्रा. रवी बापटले यांनी मायेची ऊब देऊन त्यांचा सांभाळ केला. यातील अनेकांचे विवाह होऊन ते नवा संसार थाटत आहेत. अशा विवाहित दांपत्यांना स्वतःचा निवारा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण माझ्या हातून होणे, हे मी स्वतःचे भाग्य समाजते, असे सांगून न्या. कोसमकर म्हणाल्या, एचआयव्ही संक्रमितांकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन वाईट आहे. तो बदलण्याची गरज आहे. एखाद्याला एड्स असल्याचे समजताच त्याला कुटुंबासह समाजही वाळीत टाकतो. परंतु, अशा समाजाने अस्पृश्य केलेल्यांसाठी रवी बापटले यांनी त्यांच्या सेवालय व हॅपी इंडियन व्हिलेजने पायघड्या टाकल्या आहेत. त्यांचे हे कार्य अद्वितीय असेच आहे, त्यांच्या कार्याला समाजाने पाठबळ देण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी न्या. सुरेखा कोसमकर यांनी हॅपी इंडियन व्हिलेजमधील गायी गोठा, कुकुटपालन, भाजीपाल्याची शेती, मुलांची जीम, दीड कोटी लिटर क्षमतेचे आभाळ तळे, केळी, ड्रॅगन फ्रूट, पपई, आंब्याच्या शेतीची पाहणी केली. सेवालयात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून तेथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या मुलींशी स्वतंत्रपणे संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सेवालय व हॅपी इंडियन व्हिलेजमधील सुविधा पाहून त्या भाराऊन गेल्या.
विवाहित जोडप्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पाच खोल्यांसाठी पुखराज बाहेती, अरिहंत उद्योग समूह, एस. आर. मशेट्टे, अमेरिका स्थित बन्सीलाल रामलाल लाहोटी व सुमित्रा वसंतराव निरगुडे यांच्या स्मरणार्थ मीरा विभाकर यांनी देणग्या दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم