शब्दांकित साहित्य मंच, लातूर द्वारा' विठोबा' वर चर्चासत्र संपन्न
'विठोबा' या डाॅ.ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांच्या पुस्तकाच्या मा. प्रो. डॉ गणेश राज सोनाळे कृत हिंदी अनुवादावर चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. शब्दांकित साहित्य मंच, लातूर यांच्याद्वारे आयोजित या कार्यक्रमात मा. डॉ. गंगाधर वानोडे( क्षेत्रीय निदेशक, केंद्रीय हिंदी संस्थान, हैद्राबाद )यांनी विठोबा या संग्रहावर भाष्य केले. त्यांनी विठोबा या खंड काव्याची उत्कृष्ट मीमांसा केली. या कविता म्हणजे आंतरिक संवेदनांची सृजनशील अंतर्यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले. या कविता वाचताना विठ्ठला बरोबर तू -मी असा भेद नष्ट होऊन एकात्म भाव निर्माण होतो आणि समानशील मित्राबरोबर संवाद साधल्याचा भास होतो असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दांकित साहित्य मंचाच्या संस्थापिका व 'साहित्यनयन' या युट्युब चॅनलच्या संचालिका मा. डॉ. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन' यांनी केले. सूत्रसंचालन मा. तहेसीन सय्यद यांनी केले. कवयित्री ऊर्मिला चाकूरकर यांनी शब्दांकित साहित्य मंचच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत कौतुक उद्गार काढले. तसेच 'विठोबा'च्या हिंदी अनुवादाच्या प्रक्रियेविषयी भाष्य केले. शेवटी केंद्रीय हिंदी अनुसंधान आग्रा व नवी दिल्ली येथील मुख्य निदेशक प्रो.डाॅ. सुनील कुलकर्णी- देशगव्हाणकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना 'विठोबा' हे एक विलक्षण आणि प्रभावीत करणारे खंड काव्य आहे असे नमूद केले. भक्तीचा बाजार किंवा व्यापार होऊ नये यासाठी यातील कवितांतून कवयित्रीने उपरोधक भाष्य केले आहे. साहित्य निर्मितीचा उद्देश सामान्य माणसाची वेदना दूर करणे हा असावा व सामान्य माणसाला अलौकिक आनंदाची अनुभूती त्यातून मिळावी, हे दोन्ही उद्देश 'विठोबा' या काव्यसंग्रहाने बऱ्याच अंशी साध्य केलेले आहेत असे ते म्हणाले. माणसाचा माणुसकी वरचा विश्वास दृढ करण्याचे कार्य या कवितासंग्रहाने केले आहे आणि त्याबद्दल कवयित्री अभिनंदनास पात्र आहे असे ते म्हणाले. विठोबातल्या अनेक कवितांमधून कवयित्रीच्या आगळ्यावेगळ्या दृष्टीचा प्रत्यय येतो. विठोबा समाजाचेच रूप असून विठोबाच्या रूपकातून कवयित्रीने अनेकानेक रूपात आणि अनेक भावनांमधून समाजातील विरोधाभास उलगडून दाखवला आहे असे ते म्हणाले. कालजयी साहित्य निर्मिती ची वैशिष्ट्येही त्यांनी नमूद केली. गुगलमीट या आभासी माध्यमावर झालेल्या या चर्चासत्रात अनेक मान्यवर, शब्दांकित साहित्य मंचचे सर्व सदस्य, रसिक श्रोते यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. तहसीन सय्यद मॅडम यांनी केले तर आभार अँड.रजनी गिरवलकर यांनी मानले.
إرسال تعليق