विद्यार्थ्यांच्या जीवनाचे समीकरण सोडविणारे आदरणीय गुरुवर्य नारकर सर म्हणजे गणितरुपी आचार्य गुरु हे प्रत्येकाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे असतात. गुरु म्हणजे केवळ शिकविणारे शिक्षक नाहीत तर ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत, आधारस्तंभ आणि संजीवनी असतात. आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल गुरूच्या शिकवणीमुळे पुढे पडत असतो. ते नेहमी माझ्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले असून असे गुरु आदरणीय गुरुवर्य सूर्यकांत नारकर सर लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाचा प्रवास अधिक सुखकर आणि अर्थपूर्ण बनला. माझे गुरुवर्य म्हणजे शाळेत त्यांनी मला गणित शिकविले. ते उत्कृष्ट गणित तज्ञ आहेत. त्यांनी माझ्या जीवनाचे गणितच सोडविले. सरांनी मला फक्त गणितच शिकवले नाही, तर त्यांनी माझ्या आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठीचे विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली. गणित हा विषय केवळ संख्यांशी संबंधित नसतो, तर तो तर्कशुद्ध विचार, समस्यांचे निराकरण आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन देतो. सरांनी मला माझ्या जीवनात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याचे कौशल्ये शिकविले. त्यांच्यामुळे मला जीवनाच्या विविध पैलूंवर विचार करण्याचा आणि त्यातून योग्य तो मार्ग शोधण्याचा माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे माझ्या जीवनाचे गणित सोडविताना मला विविध समस्या आणि आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य माझ्यात निर्माण झाले. गणित हा विषय तसा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असतो, परंतु सरांच्या शिकविण्यामुळे तो विषय माझ्यासाठी अत्यंत सोपा आणि रोचक बनला. सर गणित शिकविण्यात निपुण तर होतेच त्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुण वैशिष्टये मला जवळून अनुभवता व आत्मसात करता आले. जे विद्यार्थ्यांना प्रेरित करतात. माणसाच्या अंगी प्रेरणा आणि आत्मविश्वास असला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी ते नेहमी सांगत असत इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि उत्साह. सरांच्या शिकवणुकीची एक विशेषता म्हणजे ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या क्षमता व कुवतीनुसार शिकवित असत. सर एका सर्वसाधारण सुशिक्षित शेतकरी कुटूंबात पांगरी, ता. बार्शी येथे जन्मलेले असल्याने सरांना गरिबीची जाण आणि भान होते. त्यामुळे त्यांनी आयुष्यात माणुसकी कधीच सोडली नाही. सर आणि सरांच्या सौभाग्यवती प्रभाताई नारकर यांनी माणुसकी देखील नतमस्तक होईल या पद्धतीने आयुष्यभर माणुसकी जपली. त्यांनी मला केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे तर स्वतःचाच मुलगा म्हणून प्रेम दिले. त्यांच्यात घासातला घास खाऊ घालण्याची दानत या दोघांमध्ये असल्याने अनेक माणसे त्यांनी आयुष्यात जोडली. थोडक्यात काय नारकर पती-पत्नी म्हणजे माणुसकीचा झराच." ते माझ्यासाठी माणुसकीच्या आदर्शांचे आणि नैतिकतेच्या मूल्यांचे प्रतीक आहेत. माणुसकीचा झरा म्हणजे मानवता, आदर, करुणा, दया, समजूतदारपणा आणि प्रेम या गुणांनी युक्त आहेत. साहित्यात आणि कलेत देखील माणुसकीच्या या मूल्यांचे प्रतिबिंब आढळते. उदाहरणार्थ : संत साहित्यामध्ये मानवतेच्या मूल्यांचे वर्णन मोठ्या प्रमाणावर केले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांनी त्यांच्या अभंग आणि ओवीमध्ये या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला आहे. अशा प्रकारे, " माणुसकीचा झरा " हे वाक्य फक्त एक विचार नाही तर ती एक जीवनशैली आहे. जी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आनंद निर्माण करते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. सरांकडे आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसन करत असत. त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सरळ, सोपी-सुलभ, तंत्र कौशल्यावर आधारित असायची. त्यांचा कणखरबाणा, स्पष्ट भाषेत दिलेली समज विद्यार्थ्यांच्या मनात चिरंतन राहिली. त्यांची कामाप्रती असणारी लगन आणि शिस्त यामुळे मी माझ्या कामात अतिशय समर्पित राहत आहे. त्यांनी वेळेचे आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व आम्हाला पटवून दिले. गुरु म्हणजे केवळ शैक्षणिक ज्ञान देणारे शिक्षक नव्हे तर जीवनाचे सखोल तत्वज्ञान सांगणारे मार्गदर्शक. सरांनी मला केवळ गणिताचे ज्ञान दिले नाही तर त्यांनी जीवनातील महत्वाच्या मूल्यांची शिकवण देवून जीवनासाठीच्या सखोल टीप्स दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी धैर्य, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व समजू शकलो. ते नेहमीच म्हणायचे, " यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य दिशादर्शन आवश्यक आहे." गुरुंच्या कृपा आशीर्वादामुळेच माझे जीवन समृद्ध बनू शकले. त्यांच्या प्रेरणेने मी जीवनात प्रगती करु शकलो आणि त्यांच्या शिकवणीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडू शकला. मला गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास आणि ध्येयप्राप्तीची जाणीव होऊ शकली. सर माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने मला जीवनातील खरे मूल्य शोधता आले. गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळणे हे खरोखरच एक भाग्याचे लक्षण आहे. त्यांच्या विचारांचा आदर करत मी नेहमीच त्यांच्या ऋणात राहीन. मी सध्या मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. " माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात सर तुम्ही माझे मार्गदर्शक राहिलात. तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वाकडे पाहून सतत मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो." आपल्यासारखे गुरुवर्य लाभल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी मुरुडच्या नामांकित जनता विद्या मंदिर विद्यालयाचा इयत्ता दहावी सन १९८८-८९ च्या बॅचचा माजी विद्यार्थी असून मला सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जवळून अनुभवता व आत्मसात करता आले. तुमचे आचार-विचार आम्हा सर्व विद्यार्थ्यांना कायम योग्य मार्गावर ठेवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नारकर सर, मॅडम तथा नारकर परिवाराबद्दल मी सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो. दि. १६ जून २०२४ रोजी आदरणीय नारकर सरांचा ७५ वा वाढदिवस तथा अमृत महोत्सव दिन मुरुड येथे साजरा होतो आहे. सरांनी संपूर्ण कुटूंबाकडे देखील तितकेच लक्ष दिल्याने आज त्यांचे जेष्ठ चिरंजीव राहुल पुणे येथे उद्योजक, छोटे चिरंजीव तुषार (एनआयटी, गुजरात) श्रीलंका येथील नामांकित कंपनीत वरिष्ठ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर त्यांची सुकन्या पुणे येथे सौ. स्मिता (एमबीए-एच आर) ही ग्लोबल एच आर हेड या पदावर कार्यरत आहे. माझा मान, सन्मान, कीर्ती वाढविणारे मोठ्या मनाच्या व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा करून विनम्रपूर्वक वंदन करतो. शेवटी असे म्हणावेसे वाटते की, आदरणीय गुरुवर्य सूर्यकांत नारकर सर म्हणजे माणुसकीचा झरा होय." आयुष्यात बरीच माणसं येतात आणि जातात परंतु आपल्यासारखे गुरुवर्य मोठ्या नशिबाने मिळतात. " तुमचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत राहो, हीच मनःपूर्वक आपणास वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ! सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक नामी संधी असल्याने शब्द रूपाने मांडण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे.
आपलाच विद्यार्थी.....
प्रा. डॉ. महेश मोटे
मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव. भ्र. क्र. ९९२२९४२३६२
إرسال تعليق