षडयंत्री महायुती सरकारला खाली खेचण्याची हीच वेळ-आमदार धिरज देशमुख

 षडयंत्री महायुती सरकारला खाली खेचण्याची हीच वेळ-आमदार धिरज देशमुख



लातूर /प्रतिनिधी:भाजपने षडयंत्र रचून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शेती मालाला भाव नाही, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे, महागाई वाढलेली आहे, हे सांगताना त्यांनी हे जनतेच्या मनातील सरकार नाही. हे लादलेले सरकार आहे, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली, अशा शब्दांत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. काँग्रेसच्या विचारांची माणसे, आपल्या विचारांची माणसे सरकारमध्ये असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

ते औसा तालुक्यातील सत्तरधरवाडी, सोनपट्टी तांडा, कुलकर्णी तांडा, लखनगाव, उटी बु. या गावांच्या गावभेटी दरम्यान बोलत होते. याप्रसंगी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शामराव भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुप शेळके, मांजरा कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, मांजरा कारकाखान्यांचे तज्ज्ञ संचालक महिंद्र भादेकर, बाबुराव जाधव, जागृती कारखान्याचे संचालक बालाजी पाटील, संजय चव्हाण आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात महाविकास आघाडीने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली. ते म्हणाले, कोविड काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने गाव तांड्यापर्यंत ऑक्सिजन, औषध पुरवठा, निवास, भोजनाची व्यवस्था केली. आदरणीय अमित देशमुख लातूरचे पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून बरेच कामे या ठिकाणी केली. काँग्रेसच्या विचारांची माणसे, आपल्या विचारांची माणसे सरकारमध्ये असणे गरजेचे आहे.

आपण सर्वांनी मिळून मला २०१९ ला मतदानरुपी आशीर्वाद दिला व एक आमदार म्हणून माझी ओळख निर्माण झाली. विधिमंडळामध्ये आपले प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

भाजपने षडयंत्र रचून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आज शेती मालाला भाव नाही, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे, महागाई वाढलेली आहे, हे सांगताना त्यांनी हे जनतेच्या मनातील सरकार नाही. हे लादलेले सरकार आहे. महाराष्ट्रात लोककल्याणकारी सरकार हे महाविकास आघाडीचे होते. महायुतीचे हे सरकार भ्रष्टाचारी व लबाड सरकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सोयाबीनला हमीभाव नाही पण आमदारांना मात्र भाव

सोयाबीनला हमीभाव नाही पण आमदारांना भाव आला आहे. हमीभाव केंद्र बंद आहेत. जनता अडचणीत असताना जनतेला मदत करणे हे सरकारचे दायित्व असते, असे सांगून आगामी काळामध्ये महाराष्ट्रात आपल्या विचाराने चालणारे सरकार आणावयाचे आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले. पण या सरकारने आयत्या पिठावर रेघोठया मारण्याचे काम केले.

विकासाची गती वाढवायची असेल तर महाविकास आघाडीस मतदान करावे. आम्ही सरकार आणि तुमच्यातील दुवा म्हणून आपले काम करू, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

गावचा जाहीरनामा गावाने तयार करावा
 
गावातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन  शेतकरी, बेरोजगार, महिला, युवक, शेतमजूर या सर्वांना सोबत घेत गावचा जाहीरनामा गावाने तयार करावा. विकासाचा आराखडा तयार करावा. याला निधी देण्याचे काम आम्ही करू असा शब्द त्यांनी याप्रसंगी दिला.

याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत हिरामण आडे, विनायक आडे, व्यंकट कांबळे, प्रदीप कदम, मधुकर कदम, बंडू कदम, भालचंद्र पाटील, वैशालीताई कांबळे, भुजंगराव देशमुख, पंडित सूर्यवंशी, ज्ञानोबा गोडबोले, अर्जुन कदम, डॉ. श्रीधर कदम, ऋतुला आडे, बाबुराव जाधव, दिनकर कवडे, नामदेव वाडे, रफिक शेख, व्यंकट लोंढे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم