मुरुड येथील अंगणवाडी केंद्रात सेवा संकल्प अभियान आणि राष्ट्रीय पोषण माह उपक्रम उत्साहात
लातूर : महिला व बालविकास विभागाच्या मुरुड प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक २१ मध्ये गुरुवारी सेवा संकल्प अभियान आणि नवव्या राष्ट्रीय पोषण माह निमित्त गुरुवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत अंगणवाडी महोत्सव तसेच चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास मुरुड प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पठाडे, मुरुड विभागाच्या संबंधित पर्यवेक्षिका, परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी यांनी उपस्थित महिला व मातांशी संवाद साधला. त्यांनी गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी संतुलित व पोषक आहाराचे काय महत्त्व आहे, याविषयी मार्गदर्शन केले. कुपोषण मुक्तीसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक अन्नघटकांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
नव्याने नोंदणीकृत झालेल्या गरोदर मातांची औपचारिक नोंदणी करण्यात आली. तसेच बालकाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या संगोपनासाठी उपयुक्त असणारे शासकीय 'बेबी केअर किट' संबंधित मातेला वितरित करण्यात आले. समाजात मुलगी-मुलगा असा भेदभाव नष्ट व्हावा आणि स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा यासाठी कार्यक्रमात विशेष उपक्रम राबवण्यात आला. या वेळी अंगणवाडीतील मुलांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
إرسال تعليق