सायबर साक्षरता ही आता काळाची गरज – पोलीस निरीक्षक दयानंद पाटील

सायबर साक्षरता ही आता काळाची गरज – पोलीस निरीक्षक दयानंद पाटील
▪️माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद कार्यक्रमात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

लातूर : सोशल मीडियाचा वाढलेला वापर आज सायबर गुन्हेगारीसाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सायबर साक्षरता ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लातूर शहरातील द्वारकानगरी येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'लोकसंवाद' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. द्वारकानगरी गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सध्या किशोरवयीन मुलांच्या फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहेत. त्यामुळे पालकांनी सातत्याने आपल्या मुलांशी संवाद ठेवण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा, त्याचे फायदे आणि धोके मुलांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे, असे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.

आजकाल डिजिटल अरेस्टचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामध्ये नागरिकांना मादक पदार्थ किंवा तस्करीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घातली जाते. पोलीस असल्याचे भासवून लोकांना कारवाईची व डिजिटल अरेस्टची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केली जाते. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. असा कोणताही संशयास्पद कॉल आल्यास नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. पोलीस कधीही अशा प्रकारे ऑनलाईन स्वरूपात अटक करत नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी लोकसंवाद उपक्रमाबाबत माहिती दिली.

द्वारका नगरी सोसायटी अध्यक्ष उदयसिंह देशमुख, सचिव प्रेम सूर्यवंशी, कोषाध्यक्ष केशव शिरसाट, द्वारका नगरी गणेश मंडळाचे अध्यक्ष वैष्णव रेड्डी, उपाध्यक्ष आदित्य देशमुख, सचिव श्रीशैल्य झुरळे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत भिसे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم