नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालय, रूग्णालयाच्या परिसरातील कचरा डेपोमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष तात्काळ स्थलांतरित करण्याची शिवसेनेचे रवींद्र वाघमारे यांची थेट महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांकडे मागणी

 नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालय, रूग्णालयाच्या परिसरातील कचरा डेपोमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष तात्काळ स्थलांतरित करण्याची शिवसेनेचे रवींद्र वाघमारे यांची मागणी

धाराशिव-धाराशिव शहरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरालगत असलेला कचरा डेपोमुळे नागरिकांमधून तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे हा कचरा डेपो तात्काळ व कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे रवींद्र वाघमारे आणि नगरसेवक पंकज पाटील यांनी  थेट महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील नागरी वस्तीच्या लगत असलेल्या कचरा डेपोमध्ये धाराशिव शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. सदर ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कचरा साठविण्यात येत असून, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. तसेच सदर परिसराच्या आसपास शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व नागरी वस्ती असल्याने या ठिकाणी निर्माण होणार्‍या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
सदर कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठविल्यामुळे माशा, डास, भटकी जनावरे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या तसेच रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व आजारी व्यक्तींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच सदर ठिकाणी रुग्णालयांमधील खराब झालेल्या औषधांच्या बाटल्या, वैद्यकीय कचरा व इतर प्रकारचा कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय मृत जनावरेदेखील या ठिकाणी टाकली जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सदर कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्यामुळे त्यातून निघणारा धूर संपूर्ण शहरात पसरतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत असून, दुर्गंधी व विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, दमा, तीव्र खोकला, घशाचे विकार व फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचारासाठी अनावश्यक आर्थिक खर्चाचा भारही नागरिकांवर पडत आहे. विशेषतः या परिसरात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा व कावीळ यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्या नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहे.
 वसाळ्याच्या काळात कचर्‍याच्या ढिगार्‍यातून झिरपणारे दूषित पाणी जमिनीत मुरून परिसरातील तसेच कल्पसाईट भूगर्भातील पाण्याचे स्रोत, विहिरी व बोअरवेल दषित होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या  सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरणालाही गंभीर धोका पोहोचत आहे. कचरा डेपोमध्ये नगरपालिका मार्फत व विविध भागांतून कचरा आणून एका ठिकाणी असल्यामुळे सदर कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचयाचा भार पडत आहे. शहराच्या नागरी  वस्तीबरोबरच शाळा, महाविद्यालये व रुग्णालये असलेल्या परिसराच्या जवळ अशा प्रकारे कचरा साठविणे व तो जाळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण, रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले स्वच्छ वातावरण आणि नागरिकांचे आरोग्य यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
सदर कचरा डेपो अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव, नगर परिषद कार्यालय तसेच पालकमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून तक्राने व मागण्या करण्यात आल्या आहेत. तथापि, या गंभीर समस्येवर अद्याप ठोस व प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब म्हणून तातडीने दखल घेऊन सदर कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून धाराशिव शहरातील सर्व भागांतील कचरा नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरालगत टाकला जाणार नाही, यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि सदर कचरा डेपो तात्काळ व कायमस्वरूपी अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी अशी मागणीही रवींद्र सिद्राम वाघमारे यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक पंकज पाटील, शिवसेना शाखाप्रमुख अक्षय खळदकर आदी उपस्थित  होते.

Post a Comment

أحدث أقدم