“स्त्रीच्या प्रतिभेला संधी, विचारांना प्रतिष्ठा आणि लेखणीला स्वतंत्र अवकाश मिळायला हवा” - डॉ. नयन भादुले-राजमाने

“स्त्रीच्या प्रतिभेला संधी, विचारांना प्रतिष्ठा आणि लेखणीला स्वतंत्र अवकाश मिळायला हवा” - डॉ. नयन भादुले-राजमाने
धाराशिव : संत साहित्याचा सामाजिक आशय, स्त्री-अनुभवाची सृजनशीलता आणि समकालीन परिवर्तनाची गरज यांचा मार्मिक अन्वयार्थ लावत डॉ. नयन भादुले-राजमाने यांनी ‘अंकुर’ दिवाळी अंकाच्या संत साहित्य विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले. अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, धाराशिव यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाचे प्रकाशन रविवार, १८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते झाले.
      संत साहित्याकडे केवळ भक्तिपरंपरा म्हणून न पाहता त्यातील समता, माणुसकी आणि सामाजिक विवेकाचा विचार समकालीन जीवनाशी जोडून पाहण्याची गरज डॉ. भादुले-राजमाने यांनी अधोरेखित केली. संतपरंपरेने जात, वर्ण आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाण्याचा विचार दिला; मात्र या विचारांचे प्रतिबिंब आजच्या समाजव्यवस्थेत कितपत उमटते, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
      संत जनाबाईंच्या उदाहरणातून स्त्रीचे श्रम आणि साहित्यनिर्मिती यांच्यातील नाते स्पष्ट करताना त्यांनी सामान्य स्त्रीच्या जगण्यातूनही साहित्याचे अंकुर फुलत असल्याचे सांगितले. स्त्रीच्या हातातील काम आणि मनातील विचार यांच्यामध्ये भिंत नसते. तिच्या अनुभवांना अभिव्यक्तीची संधी मिळाली, तर तिच्या जगण्यालाच साहित्यिक उंची प्राप्त होते, असे त्यांनी नमूद केले.
      ‘स्त्रीने इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करावा, पण तिच्या वाट्यालाही उजेड मिळायला हवा,’ या विचारातून त्यांनी स्त्रीच्या त्यागाचे केवळ उदात्तीकरण करण्याऐवजी तिच्या प्रतिभेला संधी, विचारांना प्रतिष्ठा आणि लेखणीला स्वतंत्र अवकाश देण्याची आवश्यकता मांडली. त्यांच्या या विवेचनातून स्त्रीसाहित्याचे महत्त्व आणि महिला साहित्य मंडळांसारख्या विचारमंचाची सामाजिक भूमिका अधोरेखित झाली.
      ‘अंकुर’ या शीर्षकाचा अर्थ उलगडताना त्यांनी अंकुर म्हणजे उद्याच्या परिवर्तनाची चाहूल असल्याचे सांगितले. संतविचारांची मुळे जपत वर्तमानाशी संवाद साधणारा आणि भविष्याच्या नव्या शक्यता खुल्या करणारा हा अंक आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील बदल, नव्या जाणिवा आणि रूढींना प्रश्न विचारणाऱ्या विचारांचे दस्तऐवज असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
      कार्यकारी संपादिका श्रीमती कमलताई नलावडे यांच्या संपादकीय प्रयत्नांतून साकारलेल्या या विशेषांकात संत साहित्याच्या परंपरेला समकालीन सामाजिक जाणिवांची जोड देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई आणि संत महदंबा यांच्यासह विविध संतांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर आधारित एकूण ४४ लेखांचा या अंकात समावेश आहे. विशेष म्हणजे, आपल्याच भूमीतील संत भावंडीबाई यांच्या कार्यावरही या अंकात प्रकाश टाकणे गरजेचे होते असे त्या म्हणाल्या.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुलभाताई देशमुख होत्या. सौ. रेखाताई ढगे यांनी प्रास्ताविक केले. सौ. सुनीता गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्राची नाईकवाडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. शिवानंदा माळी यांनी कोषाध्यक्ष अहवाल सादर केला, तर सौ. जयश्री फुटाणे यांनी आभार मानले. याप्रसंगी सुनीता बोरगावकर आणि गझलकार स्नेहलता झरकर यांची उपस्थिती होती.
डॉ. नयन भादुले-राजमाने यांच्या विचारपूर्ण मनोगतामुळे प्रकाशन सोहळ्याला वैचारिक परिमाण लाभले. संतपरंपरेतील समतेचा विचार आणि आजच्या स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न यांची सांगड घालणारे त्यांचे विवेचन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

Post a Comment

أحدث أقدم