महिला पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ; विविध विषयांवर होणार विचारमंथन

महिला पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ; विविध विषयांवर होणार विचारमंथन
लातूर, प्रतिनिधी : महिला पत्रकारितेला नवी ऊर्जा देत महिला पत्रकारांना सक्षम, स्वावलंबी आणि प्रतिष्ठित बनविण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगच्या वतीने लातूर येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सुनंदाताई पवार, प्रसिद्ध वृत्तनिवेदिका व पत्रकार फराह खान आणि लातूर जिल्हा परिषद सदस्या आशा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या महिला पत्रकारांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय संघटक व सर्व विंगप्रमुख रश्मी मारवाडी, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष संगम कोटलवार आणि महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांच्या व्यावसायिक जीवनातील अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न आणि बदलत्या माध्यमविश्वातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिला पत्रकारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य वाढविणे तसेच त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी नव्या संधी निर्माण करणे, हा या अधिवेशनामागील प्रमुख उद्देश आहे.
विशेषांकाचे प्रकाशन अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया वर्ल्ड’ या मुखपत्राच्या महिला पत्रकार अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकातून राज्यातील महिला पत्रकारांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, कर्तृत्व आणि पत्रकारितेतील योगदान यांचा आढावा घेण्यात आला आहे. कार्यकारी संपादक रश्मी मारवाडी आणि वैशाली पाटील यांनी महिला पत्रकारांचे अनुभव व कार्य शब्दबद्ध केले आहेत. महिला पत्रकारांच्या प्रेरणादायी वाटचालीला उजाळा देणारा हा विशेषांक अधिवेशनाचे महत्त्वाचे आकर्षण ठरला.
महिला पत्रकारांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्हॉईस ऑफ मीडियाची वाटचाल, संघटनेचे कार्य आणि पत्रकारितेतील बदलती आव्हाने याविषयी आपले विचार मांडले. महिला पत्रकारांना संघटित व्यासपीठ मिळणे, त्यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण होणे आणि व्यावसायिक विकासासाठी मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आजच्या बदलत्या माध्यमविश्वात महिला पत्रकारांना व्यावसायिक स्पर्धेसोबतच सुरक्षितता, कामाच्या ठिकाणच्या समस्या, आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महिला पत्रकारांचे अधिकार, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरण या विषयांवर अधिवेशनात विचारमंथन होणार आहे.सहा ते आठ सत्रांतून मार्गदर्शन
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सहा ते आठ सत्रांच्या माध्यमातून महिला पत्रकारितेशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. अनुभवी महिला मार्गदर्शकांच्या सहभागातून पत्रकारितेतील संधी, आव्हाने, अधिकार आणि स्वावलंबनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून, रविवारी अधिवेशनाचा समारोप होईल.
महिला पत्रकारांच्या अनुभवांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांवर सामूहिक चर्चा व्हावी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना अधिक सक्षमपणे वाटचाल करता यावी, या उद्देशाने लातूरमध्ये सुरू झालेला हा राज्यस्तरीय मेळावा महिला पत्रकारितेला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم