दयानंद विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न

 दयानंद विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न

लातूर-चौफेर वाचन, विद्वत्ता आणि सूक्ष्म निरीक्षण या गुणांच्या बळावरच सामान्य माणसाचे दुःख कमी करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर व्हावा, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा प्रख्यात साहित्यिक डॉ नागोराव कुंभार यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी केले.ते म्हणाले, लोकशाही ही मानवजातीसाठी वरदान आहे. कायद्याचे राज्य आणि कायद्यापुढे सर्व समानता हे लोकशाहीचे मुख्य सूत्र आहे. शासनाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ व ध्येयनिष्ठ राहण्यासाठी लोकशाहीच पूरक ठरते.भारतीय न्यायव्यवस्था धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या दोन स्तंभांवर अवलंबून आहे. निर्भय आणि निष्पक्षपतीपणाने  न्यायदानाच्या व्यवस्थेमुळे शोषित आणि वंचित घटकांना सामाजिक न्याय दिला जातो.  न्यायव्यवस्था मजबूत असणे म्हणजे देशाची विवेकबुद्धी शाबूत असल्याचे लक्षण आहे.त्यामुळे न्यायाधीशांनी रामशास्त्री बाणा स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.अनेक संकटांना तोंड देत गेल्या ७५ वर्षांपासून भारतीय लोकशाही जिवंत आहे आणि भारतीय संविधानातील मूल्यांच्या आधारे लोकमानस घडविण्याचे महान कार्य हे केवळ लोकशाहीच्या माध्यमातूनच घडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. आशिष बाजपाई, सह सचिव ॲड. श्रीकांत उटगे, राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठीचे परीक्षक डॉ. गणेश बेळंबे, डॉ रत्नाकर बेडगे, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, प्राचार्या डॉ. पुनम नाथानी, समन्वयक ॲड. रवींद्र शेट्टी आणि प्रा. उमेश काटेकर यांची उपस्थिती होती.या वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण २१ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने, सोशल मीडियाने लोकशाही कमकुवत करण्यापेक्षा अधिक बळकट केली आहे? या विषयावर आपले अनुकूल आणि प्रतिकूल मत मांडत असताना आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये सोशल मीडियाची भूमिका, जनमतनिर्मिती, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, माहितीचा प्रसार तसेच सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम मांडले  जसे की लोकशाहीमुळे सोशल मिडीयाला  व्यासपीठ मिळाले; माणसाला नैसर्गिक रित्या मरण स्वीकार्य आहे परंतु सोशल मीडिया मुळे माणसातील अस्वस्थता व अस्थिरता वाढून चिडचिड, नैराश्य, उदासीनता याच्या आहारी माणूस जात आहे;आजच्या सत्ताधाऱ्याला नागरिकाच्या हातातील उपकरणाची धास्ती आहे; पूर्वी सत्ता बोलायची जनता ऐकायची, आता जनता बोलत आहे आणि सत्ता ऐकत आहे; पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा सोशल मीडियावर झेंडा; सोशल मीडियाने ज्ञान मिळत आहे, पण शहाणपण हिरावून घेतले जात आहे अशा विविध पद्धतीने विषय मांडले. सहभागी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभावी वक्तृत्व, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि वैचारिक परिपक्वतेच्या माध्यमातून स्पर्धेत चुरस निर्माण केली.या वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.बळवंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. वादविवाद स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची भूमिका पार पडतात कारण त्यांना एकाच विषयाच्या दोन्ही बाजूंनी चौकस अभ्यास करून आपले मत मांडावे लागते. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, वक्तृत्वकला, आत्मविश्वास, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि समकालीन सामाजिक प्रश्नांचे आकलन विकसित होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले.स्पर्धेची लढत अटीतटीची होत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट वादविवादाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावित आदित्य दराडे व  प्रथमेश गिरी यांनी ११००१ रु .चे पारितोषिक मिळवले;  सांघिक द्वितीय क्रमांक दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा असून गीतांजली निंगुरक व बर्गे अशोक याना ७००१ रु .चे पारितोषिक प्रदान करण्यात आले तर सांघिक तृतीय क्रमांकावर कॉक्सिट महाविद्यालय लातूर राहिले, विक्रांत गंजगोले व अरब जीकर यांना ५००१ रुपयाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले; उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये अनुकूल  बाजू साठी प्रथम पारितोषिक ढगे ओम, दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी यांना तर अनुकूल बाजू द्वितीय  कल्पना कांबळे, दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांना मिळाले तसेच प्रतिकूल बाजू प्रथम पारितोषिक ढगे वैष्णवी, बिडवे इंजिनियरिंग कॉलेज लातूर, यांना तर प्रतिकूल बाजू द्वितीय अनिसा मुजावर  यांना प्रत्येकी १००१ रु. चे पारितोषिक प्रदान करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती ढगे, कस्तुरी पात्रुडकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी पांचाळ, डॉ. पुनम नाथानी यांनी केले. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या स्पर्धेचे सर्व आयोजन आणि नियोजन आदिती ढगे, कस्तुरी पात्रुडकर व अमीत कराड आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थ्यांनीच केल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم