लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना 'राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन' मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न

 लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना 'राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन' मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न



लातूर : सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, रुग्णांना गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून 'राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके' (एनक्यूएएस) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ६ ग्रामीण रुग्णालये, १८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ११६ आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांना एनक्यूएएसचे राष्ट्रीय मानांकन मिळवून देण्यासाठी सेवा संकल्प अभियान काळात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मानकांअंतर्गत गर्भधारणा व प्रसूतीदरम्यानची काळजी, नवजात व अर्भक आरोग्य, बाल व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, आणीबाणीच्या वैद्यकीय सेवा तसेच मानसिक आरोग्य सेवा अशा विविध सुविधांची पाहणी राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या बाह्य मूल्यांकनकर्त्यांमार्फत केली जाते, ज्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय मानांकन प्रदान केले जाते.

लातूर जिल्ह्याने यापूर्वी १ ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ८२ आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळवून देत राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार पटकावला आहे. चालू वर्षातही जिल्ह्यातील ६ ग्रामीण रुग्णालये, १८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ११६ आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांना एनक्यूएएसचे राज्यस्तरीय मानांकन मिळाले असून, आता या सर्व संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा गुणवत्ता कक्षाद्वारे नियोजनबद्ध कृती आराखडा राबवला जात आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे हे आरोग्य संस्थांमधील सुविधांचा दर्जा सुधारणे, स्वच्छता व संसर्ग नियंत्रण, दस्तऐवज अद्ययावत ठेवणे आणि मूल्यांकनातील त्रुटी वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर देत आहेत. या मोहिमेत नियमित बैठका, राज्यस्तरीय मूल्यांकनकर्त्यांच्या मेंटर भेटी, नोडल अधिकाऱ्यांचे दौरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्रुटी दूर करण्यावर आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर काम केले जात आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सेवा देणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी एनक्यूएएसचे मानांकन हे रुग्णांना मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेचे प्रतीक असून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून अधिकाधिक संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم