लातूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील दिवाणजी मंगल कार्यालयात महाविधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय सेवांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत थेट पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या योजनांची व्यापक जनजागृती करावी आणि प्रत्यक्ष लाभ वितरण करावे, अशा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य विभागाने या शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. क्षयमुक्त लातूर जिल्हा बनविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची जनजागृती करावी, नागरिकांना नि-क्षय मित्र बनण्यासाठी आवाहन करावे, तसेच शिबिरस्थळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून नागरिकांना आरोग्य लाभ मिळवून द्यावा, असे जिल्हाधिकरी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले.
शिबिराचे नियोजन वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी लवकरात लवकर आपापल्या योजनांची आणि संभाव्य लाभार्थ्यांची माहिती सादर करावी, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले.
إرسال تعليق