लातूरमध्ये 'श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सवा'ची जय्यत तयारी; धार्मिक विधींसह रंगणार स्वरांची भव्य मैफल!

 लातूरमध्ये 'श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सवा'ची जय्यत तयारी; धार्मिक विधींसह रंगणार स्वरांची भव्य मैफल!


लातूर ( प्रतिनिधी) :लातूर शहरातील प्रसिद्ध जगदंबा मार्केट, गोलाई येथे श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने ५८ व्या वर्षात पदार्पण करत असलेला भव्य नवरात्रोत्सव यंदा दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात दररोज प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते महापूजा आणि रात्री देशपातळीवरील दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत शास्त्रीय व भक्तीसंगीताची भव्य मैफल रंगणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवशंकरअप्पा बिडवे यांनी दिली आहे. या महोत्सवाची सुरुवात रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१.०५ वाजता मंडळाचे अध्यक्ष सौ. व श्री. शिवशंकरअप्पा बिडवे यांच्या हस्ते घटस्थापनेने होईल, तर त्याच दिवशी सायंकाळी ८.०० वाजता धर्मादाय सहआयुक्त विद्याधर मोरे यांच्या हस्ते पहिली महापूजा संपन्न होईल. नवरात्रीच्या नऊ दिवसांत लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासरावजी देशमुख, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपरावजी देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, मुख्य अभियंता अरविंद बुलबुले आणि कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. निता हेमंत मडके यांसारख्या विविध प्रशासकीय व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते दररोज संध्याकाळी ८.०० वाजता मुख्य महापूजा संपन्न होणार आहे. यासोबतच सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी वीरशैव तेली समाज महिला समितीच्या वतीने आणि शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी देशस्थ लिंगायत ब्राह्मण महिलांच्या वतीने विशेष 'कुंकुमार्चन' सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सांस्कृतिक मंच संगीतप्रेमींसाठी अत्यंत दिमाखदार असणार असून दररोज रात्री ९.३० वाजता देशभरातील नामवंत कलावंतांच्या स्वरांची मैफल रंगणार आहे. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी लातूरच्या कु. वैष्णवी वरकते आणि श्री. संतोष बीडकर यांच्या शास्त्रीय व भक्तीसंगीताने मैफलीची सुरुवात होईल. त्यानंतर मंगळवारी श्री. गणेश सुतार व सौ. आसावरी बोधनकर यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी होईल. बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या प्रसिद्ध गायिका सौ. भाग्यश्री देशपांडे यांचे शास्त्रीय व सुगम गायन होईल, तर गुरुवारची रात्र धारवाड-शिवमोगा येथील श्री. नीनाद व निषाद हरलापूरकर यांच्या सुश्राव्य जुगलबंदीने गाजणार आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी पुण्याचे पं. नागेश आडगावकर आणि शनिवार,
फक्त 17 ऑक्टोबर चे देवस्थानच्या वतीने मुख्य कुंकुम अर्चन कार्यक्रम ( श्री सूक्तासह देवीला कुंकुम अभिषेक) आणि रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी कोलकात्याचे विश्वप्रसिद्ध उस्ताद अरशद अली खान यांचे बहारदार शास्त्रीय गायन होणार आहे. महोत्सवाच्या सांगता पूर्वसंध्येला सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी डोंबिवलीचे ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे सुश्राव्य सांप्रदायिक कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या सर्व मैफलींना श्री. जनार्धन गुडे, श्री. सचिन जाधव, श्री. हरिश कुलकर्णी, श्री. मंदार दीक्षीत, श्री. मिहीर जोशी, श्री. स्वानंद कुलकर्णी आणि श्री. सोहम देशमुख हे हार्मोनियमवर, तर श्री. कृष्णकांत चव्हाण, श्री. शंकर जगताप, श्री. कौस्तुभ तळेकर, श्री. प्रशांत गाजरे, श्री. प्रसाद करंदीकर, श्री. ऋषिकेश जगताप, श्री. अक्षय सिसोदिया आणि श्री. विशाल सोनवंसी हे तबल्यावर आणि श्री. अक्षय चव्हाण व श्री. तुकाराम डाडगे हे पखवाजावर संगत करणार आहेत. शेवटी मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या (दसरा) पावन पर्वावर सकाळी १०.३० वाजता महापूजा व त्यानंतर सकाळी ११.०० वाजता भव्य महाप्रसाद वितरणाने या ५८ व्या नवरात्र महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ लातूर जिल्ह्यातील सर्व भाविक आणि संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन उत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم