नाथपंथी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार-अजित पाटील कव्हेकर यांची ग्वाही.
लातूर (प्रतिनिधी) - देशाच्या संस्कृतीचा वारसा जपणारा नाथपंथी समाज लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाने विविध अडचणींना तोंड देत संस्कृती जतन करण्यासाठी केलेले कार्य महत्वाचे असून त्यांच्या समस्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
आखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा लातूरच्या शिष्टमंडळाने भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी व्हावी यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, शहर व परिसरात ध्यान व साधना केंद्र उभारण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी आणि विध्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. या शिष्टमंडळाशी संवाद साधताना अजित पाटील कव्हेकर बोलत होते.
समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करणे हाच ध्यास घेवून भारतीय जनता पक्ष काम करत असल्याचे सांगून अजित पाटील कव्हेकर म्हणाले कि मागील काळात देशाच्या संस्कृतीवर घाला घालण्याचे काम झाले होते. आपली संस्कृती आणि वारसा कसा नष्ठ होईल यासाठी अनेक खटाटोप करण्यात आले होते. मात्र देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी धुरा सांभाळताच देशाची संस्कृती आणि वारसा हीच आपली खरी ताकत असून ती जोपासून अबाधित ठेवण्यासाठी आवहान केले होते. त्यामुळेच आपली संस्कृती टिकवणारा नाथपंथी समाज महत्वाचा असून त्यांच्या समस्या सोडविणे तितकेच आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. समाजाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी शासन दरबारी जेथे जेथे आवश्यक आहे तेथे पाठपुरावा करून नाथपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
यावेळी नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने अजित पाटील कव्हेकर यांचा सत्कार करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मधुरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी, उपाध्यक्ष परमेश्वर गायकवाड, प्रेमनाथ चव्हाण, शंकर चव्हाण, रविंद्रनाथ जाधव , नवनाथ जोगी, विठ्ठल चव्हाण, दत्ता गायकवाड, ऋषिकेश इंगळे, सोमनाथ मधुरकर, गहिनीनाथ कोरे, ओमकार मधुरकर, अमोल चव्हाण यांच्यासह आदींचा समावेश होता. याप्रसंगी भाजप शहर जिल्हा सरचिटणीस प्रमोद गुडे, मंडल अध्यक्ष गोपाळ वांगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق