दुष्काळग्रस्तांसाठी जनता सहकारी बँकेकडून ३६ लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांसाठी जनता सहकारी बँकेकडून ३६ लाखांची मदत
धाराशिव : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटात सापडले असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने ३६ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासद, ठेवीदार व कर्जदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने बँकेच्या नफ्यातून उभारलेल्या राष्ट्रीय आपत्ती निधीतून (National Calamity Fund) महाराष्ट्र राज्यासाठी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक राज्यासाठी ११ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी बँकेचे चेअरमन वसंत संभाजीराव नागदे म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात बँकेचे सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم