केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर धाराशिव लोकसभा मतदार संघातील दुष्काळाची भीषणता व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या! — खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर धाराशिव लोकसभा मतदार संघातील दुष्काळाची भीषणता व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या! — खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर         

धाराशिव-धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना विशेष मदतीची गरज – खासदार ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांची मागणी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांना विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून, पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादन, पशुधन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न यावर गंभीर परिणाम होत आहेत. पीक नुकसान, वाढते कर्ज, कर्जफेडीचा ताण आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि वेळेत निर्णय घेणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि केंद्र सरकारकडे तातडीने सकारात्मक अहवाल सादर करून विशेष मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रलंबित पीकविमा दाव्यांचा तातडीने निपटारा करून नुकसानभरपाई अदा करणे, धाराशिव जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज मंजूर करणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत मदतीत वाढ करुन नियमानुसार मदत उपलब्ध करून देणे, तसेच मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीची कामे व पुरेसा रोजगार निर्माण करणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.याशिवाय, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, पेन्शन, घरकुल, मुलांचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदतवाढ, कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, व्याजामध्ये सवलत आणि कर्ज पुनर्गठनाबाबत आवश्यक निर्णय घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पशुधनासाठी चारा, सिंचन सुविधा आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. “शेतकरी हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसान यामुळे शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या संकटाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे प्राण वाचवणे, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणे आणि त्यांना सन्मानाने जगता येईल अशी परिस्थिती. 
 निर्माण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तातडीने समन्वय साधून ठोस, प्रभावी आणि कालबद्ध उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी खासदार ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.

Post a Comment

أحدث أقدم