शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला येथे पीएच.डी. संशोधन केंद्रास मान्यता
फार्मसी शिक्षण व संशोधन क्षेत्रात महाविद्यालयाची ऐतिहासिक भरारी; डॉ. समीर शफी व डॉ. सूरज मालपाणी यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता
आलमला, प्रतिनिधी : शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला, ता. औसा, जि. लातूर या महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून फार्मास्युटिकल सायन्सेस विषयातील पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच महाविद्यालयातील डॉ. समीर शफी आणि डॉ. सूरज मालपाणी यांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. या दुहेरी यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीत महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
सन २००४ मध्ये बी. फार्मसी अभ्यासक्रमापासून सुरू झालेल्या महाविद्यालयाने सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. सध्या महाविद्यालयात डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि फार्म. डी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आता पीएच.डी. संशोधन केंद्राच्या मान्यतेमुळे उच्च शिक्षणासोबतच संशोधनाच्या क्षेत्रातही महाविद्यालयाला नवी संधी प्राप्त झाली आहे.
डॉ. समीर शफी आणि डॉ. सूरज मालपाणी यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मिळालेल्या मान्यतेमुळे फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हे यश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्रशासकीय अधिकारी योगेश धाराशिवे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे यांचे मार्गदर्शन व योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या प्रसंगी जयशंकर हूरदळे व प्रभाकर लोहारे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदनकेले. पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता मिळाल्याने महाविद्यालयात संशोधनाभिमुख शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या यशामुळे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी च्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. समीर शफी आणि डॉ. सूरज मालपाणी यांचे अभिनंदन केले असून, महाविद्यालयाच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
إرسال تعليق