सणाच्या उत्साहात निष्काळजीपणा नको; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू देऊ नका – लातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

सणाच्या उत्साहात निष्काळजीपणा नको; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू देऊ नका – लातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

लातूर : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. या सणानिमित्त नागरिकांची नातेवाईकांकडे ये-जा वाढते. विशेषतः ग्रामीण भागात बहिणीला माहेरी आणण्यासाठी, नातेवाईकांच्या भेटीसाठी तसेच सणाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकजण दुचाकीवरून प्रवास करतात. मात्र, या आनंदाच्या प्रवासात स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. दुचाकी चालविताना तसेच मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा, असे कळकळीचे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना बसविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, रस्त्यांची खराब अवस्था तसेच इतर वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात घडण्याची शक्यता असते. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे हेल्मेटचा वापर ही केवळ वाहतूक नियमांची पूर्तता नसून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घेतलेली महत्त्वपूर्ण खबरदारी आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. विविध माध्यमांतून नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व, त्याचे फायदे आणि अपघाताच्या प्रसंगी हेल्मेटमुळे होणारे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःहून सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
दिवाळी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडताना हेल्मेट सोबत घेण्यास विसरू नका. काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या कुटुंबाचा आनंद कायमच्या दुःखात बदलू शकतो. आपण सुखरूप घरी परतणे हीच आपल्या कुटुंबासाठी दिवाळीची सर्वात मोठी भेट आहे.
त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा, वाहतुकीचे नियम पाळा, वेगावर नियंत्रण ठेवा आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आनंदाची दिवाळी साजरी करा, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

أحدث أقدم