‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४७१ गावांना भेटी, २२ हजार ७४७ नागरिकांशी साधला थेट संवाद
लातूर: आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षाविषयक समस्यांचा वेळीच आढावा घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४७१ गावांना भेटी देत पोलिसांनी तब्बल २२ हजार ७४७ नागरिकांशी थेट संवाद साधला आहे.
पाणीटंचाईचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यावर होत नसून त्याचा शेती व्यवसाय, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींवरही होण्याची शक्यता आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न घटल्यास शेतकरी आणि शेतमजुरांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी रोजगाराच्या शोधात अनेकांना गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागू शकते. या संभाव्य परिस्थितीचा विचार करून लातूर पोलीस दलाने ग्रामीण भागाच्या सुरक्षेसाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
गावातील नागरिक स्थलांतरित झाल्यानंतर दीर्घकाळ बंद राहणाऱ्या घरांमध्ये चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. तसेच शेतशिवारातील पशुधन, कृषी अवजारे, शेती साहित्य, विद्युत मोटारी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा संभाव्य घटनांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
या उपक्रमांतर्गत गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी सतर्क राहणे, पशुधन व शेती साहित्याची काळजी घेणे, गावाबाहेर जाताना घराच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करणे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देणे, याबाबत जनजागृती केली जात आहे.
या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील तरुणांचा सहभाग घेऊन ‘ग्रामसुरक्षा दला’ची स्थापना करणे. स्थानिक युवकांच्या सहकार्याने गाव आणि शेतशिवारातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, नागरिकांमध्ये परस्पर समन्वय वाढविणे आणि चोरीसारख्या संभाव्य घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढविणे, विश्वासाचे नाते दृढ करणे आणि गावाच्या सुरक्षेची सामूहिक जबाबदारी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्यांचा वेध घेऊन त्यावर आधीच उपाययोजना करण्याचा लातूर जिल्हा पोलीस दलाचा हा प्रयत्न आहे. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी जनजागृती, पूर्वतयारी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर भर देत ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
إرسال تعليق