त्रिपुरारी पौर्णिमेचा महिमा; कार्तिक स्वामी दर्शन, मंगळ दोष शांती आणि ऋणमुक्तीचे विशेष उपाय!
हिंदू धर्मशास्त्रात कार्तिक महिन्याला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. या महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दीपावली म्हणून ओळखले जाते. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून देवतांना त्याच्या अत्याचारांतून मुक्त केले, अशी पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची विशेष पूजा-अर्चा केली जाते. दीपदान, गंगास्नान, दानधर्म आणि देवदर्शन यांनाही या दिवशी विशेष महत्त्व आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा आणि श्री कार्तिक स्वामी (कार्तिकेय) यांच्या दर्शनाचा धार्मिकदृष्ट्या जवळचा संबंध मानला जातो. विशेषतः कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्राचा योग आल्यास कार्तिक स्वामींचे दर्शन अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची परंपरा असून, महिलांसाठीही हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.
श्री कार्तिक स्वामींची पौराणिक कथा आणि महिमा
श्री कार्तिक स्वामी हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र, देवतांचे सेनापती तसेच ज्ञान, पराक्रम, साहस आणि ब्रह्मचर्याचे प्रतीक मानले जातात. तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांच्या दिव्य तेजापासून त्यांचा जन्म झाल्याची पौराणिक कथा आहे.
'शरवण' नावाच्या सरोवरात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना 'शरवणभव' असे संबोधले जाते. सहा कृत्तिका मातांनी त्यांचे संगोपन केल्यामुळे त्यांना 'कार्तिकेय' हे नाव प्राप्त झाले. सहा मुखे असल्यामुळे ते 'षडानन' किंवा 'षण्मुख' म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
अत्यंत अल्पवयातच त्यांनी देवसेनेचे नेतृत्व स्वीकारले. तारकासुर, शूरपद्म आणि सिंहमुख या बलाढ्य असुरांचा पराभव करून देवतांना विजय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना 'देवसेनापती' आणि 'महासेन' अशी नावे प्राप्त झाली.
उत्तर आणि पश्चिम भारतात ते कार्तिक स्वामी किंवा कार्तिकेय म्हणून पूजले जातात, तर दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमध्ये त्यांची भगवान मुरुगन आणि सुब्रह्मण्य स्वामी या नावांनी उपासना केली जाते. तमिळनाडूमधील त्यांची सहा प्रमुख मंदिरे 'अरुप्पडै वीडू' म्हणून प्रसिद्ध आहेत.
श्री कार्तिक स्वामींचे वाहन मोर असून, तो अहंकारावर विजय मिळविण्याचे प्रतीक मानला जातो. त्यांच्या हातातील 'वेल' हे दिव्य भालेसदृश अस्त्र माता पार्वतीने प्रदान केलेल्या शक्तीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
महिलांसाठी कार्तिक स्वामी दर्शनाचे महत्त्व
धार्मिक लोकपरंपरेनुसार, कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आणि तपस्वी असल्याने त्यांच्या दर्शनाबाबत काही विशेष मान्यता प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, त्यांच्या तपस्येत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी स्त्रियांच्या दर्शनासंबंधी शाप दिल्याची कथा सांगितली जाते. पुढे माता पार्वती आणि देवतांच्या विनंतीवरून त्यांनी त्याला उःशाप दिल्याचीही आख्यायिका आहे.
या लोकश्रद्धेनुसार कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला, विशेषतः कृत्तिका नक्षत्राच्या योगावर महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते, अशी मान्यता आहे. या दिवशी दर्शन घेतल्याने अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कार्तिक स्वामींचे दर्शन आणि कृत्तिका नक्षत्राचे महत्त्व
कार्तिक स्वामींचे संगोपन सहा कृत्तिका मातांनी केल्यामुळे कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र यांचा विशेष धार्मिक संबंध मानला जातो. या नक्षत्राच्या योगावर कार्तिक स्वामींची पूजा, मंत्रजप आणि दर्शन केल्याने विशेष पुण्यफल प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
या दिवशी कार्तिक स्वामींना मोरपीस, लाल फुले, रुईची फुले, गूळ-खोबरे आणि पेढे अर्पण करण्याची परंपरा आहे. भाविकांनी श्रद्धेने पूजा करून श्री कार्तिक स्वामींचे आशीर्वाद घ्यावेत.
महाराष्ट्रात कोल्हापूर (जोतिबा रोड, घाटी दरवाजाजवळ), पुणे (पर्वती), नाशिक (पंचवटी) आणि सातारा येथील कार्तिक स्वामी मंदिरांमध्ये या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
कार्तिक स्वामींचे प्रभावी मंत्र आणि स्तोत्र
श्री कार्तिक स्वामींची आराधना करताना मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे मनःशांती, एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
१. श्री कार्तिकेय ध्यान श्लोक
षडाननं कुङ्कुमरक्तवर्णं महामतिं दिव्यमयूरवाहनम्।
रुद्रस्य सूनुं सुरसैन्यनाथं गुहं सदाऽहं शरणं प्रपद्ये॥
अर्थ : सहा मुखे असणारे, कुंकवाप्रमाणे तेजस्वी वर्ण असणारे, महाबुद्धिमान, दिव्य मोरावर आरूढ झालेले, भगवान शंकरांचे पुत्र आणि देवसेनेचे नायक असलेल्या श्री कार्तिकेय स्वामींना मी सदैव शरण जातो.
२. कार्यसिद्धी आणि विजयासाठी मंत्र
स्कन्दः कुमारो भक्तानां पालको मयूरवाहनः।
तारकारिर्महातेजाः षण्मुखः पातु सर्वदा॥
अर्थ : भक्तांचे रक्षण करणारे, मयूरवाहन, तारकासुराचा नाश करणारे, महातेजस्वी आणि सहा मुखे असलेले श्री स्कंद कुमार आमचे सदैव रक्षण करोत.
३. सुख-शांती आणि संतानप्राप्तीसाठी मंत्र
॥ ॐ श्री शरवणभवाय नमः ॥
हा श्री कार्तिक स्वामींचा षडाक्षरी मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रद्धेने या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, एकाग्रता आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचे बळ मिळते, अशी मान्यता आहे.
४. कार्तिकेय गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि।
तन्नो षण्मुखः प्रचोदयात्॥
५. श्री कार्तिक स्वामी नमस्कार मंत्र
नमस्ते शारदाम्भोज वदनाय महात्मने।
मयूरासनसंस्थाय कार्तिकेयाय ते नमः॥
अर्थ : शरद ऋतूतील कमळाप्रमाणे प्रसन्न मुख असणाऱ्या आणि मोरावर विराजमान झालेल्या महात्मा श्री कार्तिकेय स्वामींना माझा नमस्कार असो.
याशिवाय 'ॐ श्री स्कन्दाय नमः' या मंत्राचाही श्रद्धेने जप करावा.
त्रिपुरारी पौर्णिमेला मंगळ दोष निवारणाचे विशेष उपाय
यंदा त्रिपुरारी पौर्णिमा मंगळवारी येत असल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित उपासना आणि उपाय करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला भूमिपुत्र, साहस, पराक्रम आणि ऊर्जेचा कारक मानले जाते. त्यामुळे मंगळ दोष शांतीसाठी पुढील उपाय श्रद्धेने करता येतात.
१. तांबड्या वस्तूंचे अर्पण : कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांना जास्वंद किंवा गुलाबाची लाल फुले, लाल चंदन आणि मोरपीस अर्पण करावे.
२. गूळ आणि मसूर डाळीचे दान : मंगळवारी गरजू व्यक्तींना गूळ, मसूर डाळ किंवा तांब्याचे भांडे दान करावे.
३. दीपदान आणि मंत्रजप : सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भगवान शंकर किंवा कार्तिक स्वामींच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा अथवा गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर 'ॐ भौमाय नमः' या मंत्राचा जप करावा.
४. कार्तिक स्वामींची आराधना : या दिवशी श्री कार्तिक स्वामींच्या मंत्रांचे पठण करून त्यांची मनोभावे पूजा करावी. मंगळ ग्रहाशी संबंधित प्रतिकूलता कमी होण्यासाठी प्रार्थना करावी.
कर्जमुक्ती आणि आर्थिक समृद्धीसाठी ऋणमोचक मंगळ स्तोत्र
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाचा संबंध धैर्य, पराक्रम, भूमी, संपत्ती आणि कर्जाशी जोडला जातो. मंगळ दोष शांती, ऋणमुक्ती आणि आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी 'ऋणमोचक मंगळ स्तोत्रा'चे पठण फलदायी मानले जाते. मंगळवारी तसेच कार्तिक पौर्णिमेला या स्तोत्राचे श्रद्धेने पठण करण्याची परंपरा आहे.
॥ श्री ऋणमोचक मंगळ स्तोत्रम् ॥
मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।
स्थिरासनो महाकायः सर्वकर्मविरोधकः॥ १ ॥
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।
धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः॥ २ ॥
अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः।
वृष्टेः कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रदः॥ ३ ॥
एतानि कुजनामानि नित्यं यः श्रद्धया पठेत्।
ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात्॥ ४ ॥
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम्॥ ५ ॥
स्तोत्रमङ्गारकस्यैतत् पठनीयं सदा नृभिः।
न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्॥ ६ ॥
अङ्गारक महाभाग भगवन् भक्तवत्सल।
त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय॥ ७ ॥
ऋणरोगादिदारिद्र्यं ये चान्ये ह्यपमृत्यवः।
भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा॥ ८ ॥
अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः।
तुष्टो ददासि साम्राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्॥ ९ ॥
विरञ्चिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा।
तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः॥ १० ॥
पुत्रान् देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः।
ऋणदारिद्र्यदुःखेन शत्रूणां च भयात्ततः॥ ११ ॥
एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौति च धरासुतम्।
महतीं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा॥ १२ ॥
॥ इति श्रीस्कन्दपुराणे भार्गवप्रोक्तं ऋणमोचक मङ्गलस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा पर्व
त्रिपुरारी पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून अंधारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा आणि अहंकारावर भक्तीचा विजय दर्शविणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान शंकरांची आराधना, कार्तिक स्वामींचे दर्शन, दीपदान, मंत्रजप आणि दानधर्म केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
त्यामुळे या पवित्र पर्वाच्या निमित्ताने भगवान शिव आणि श्री कार्तिक स्वामींचे स्मरण करून जीवनातील संकटे दूर होण्यासाठी, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.
लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन व आध्यात्मिक प्रशिक्षक, अभ्यासक, लेखिका आणि मार्गदर्शक
अनुभव : २३ वर्षांहून अधिक
संपर्क : ९६३७१२५११९
إرسال تعليق