त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव; भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा प्रकाशोत्सव!
२४ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा, देव दीपावली आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा मंगल सोहळा
ॐ नमः शिवायच्या गजरात उजळू दे आसमंत सारा,
त्रिपुरासुराच्या वधाने वाहू दे मांगल्याचा वारा।
लाखो दिव्यांच्या प्रकाशात दूर होवो अंधार जगाचा,
त्रिपुरारी पौर्णिमेला लाभो आशीर्वाद भोलेनाथाचा॥
महाराष्ट्राला सण-उत्सवांची समृद्ध परंपरा लाभली आहे. प्रत्येक सणामागे धार्मिक श्रद्धा, पौराणिक कथा, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. याच परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली. दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळवणारा हा उत्सव भक्ती, मांगल्य आणि विजयाचे प्रतीक मानला जातो.
सन २०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी होणार असून, समाप्ती मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी होईल.
त्रिपुरारी पौर्णिमेची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, तारकासुराच्या तीन पुत्रांनी म्हणजेच तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून 'त्रिपुर' नावाच्या तीन अभेद्य नगरींचे वरदान प्राप्त केले होते. या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी देवता आणि ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अत्याचारांमुळे संपूर्ण सृष्टीत भयाचे वातावरण निर्माण झाले.
देवता आणि ऋषीमुनींनी भगवान शंकरांकडे धाव घेतली. त्यानंतर भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एकाच बाणाने या तिन्ही नगरींचा नाश केला आणि त्रिपुरासुराचा अंत करून देवतांना भयमुक्त केले. या विजयामुळे भगवान शंकरांना 'त्रिपुरारी' हे नाव प्राप्त झाले.
त्रिपुरासुराच्या वधानंतर सर्व देवतांनी पृथ्वीवर, विशेषतः काशी नगरीत गंगा नदीच्या तीरावर लाखो दिवे प्रज्वलित करून विजयोत्सव साजरा केला, अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिव्य परंपरेतून कार्तिक पौर्णिमेला 'देव दीपावली' किंवा 'देवांची दिवाळी' म्हणून ओळखले जाते.
काशीतील घाटांवर भव्य दीपोत्सव
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे देव दीपावलीचा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो. गंगा नदीच्या ८४ हून अधिक घाटांवर लाखो मातीचे दिवे प्रज्वलित करून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला जातो. विशेष गंगा महाआरती, शंखनाद, पारंपरिक नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हा उत्सव अधिकच देखणा ठरतो. दिव्यांच्या रोषणाईने गंगेचे घाट सोन्यासारखे झळाळून निघतात. देश-विदेशातील असंख्य भाविक आणि पर्यटक या अद्भुत दीपोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी वाराणसीत दाखल होतात.
महाराष्ट्रातही दीपोत्सवाची समृद्ध परंपरा
महाराष्ट्रात त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्राचीन मंदिरांसमोरील उंच दगडी दीपमाळांवर दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, रंकाळा तलाव परिसर तसेच श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे या निमित्ताने विशेष दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिर परिसरातील दीपमाळा आणि दिव्यांची रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेते. गोव्यातील श्री मंगेशी आणि शांतादुर्गा मंदिरांमधील दीपोत्सवही प्रसिद्ध आहे.
कार्तिक पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागृत होतात. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देवतांसह आनंदोत्सव साजरा करतात, अशी श्रद्धा आहे. या दिवसाने चातुर्मासाची सांगता होते आणि विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ व मंगल कार्यांना पुन्हा प्रारंभ होतो.
कार्तिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले स्नान, दान, जप, तप आणि दीपदान विशेष पुण्यदायी असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. विशेषतः कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि अन्नदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन, उपासना आणि ध्यानधारणा यांना विशेष महत्त्व दिले जाते. कृतिका नक्षत्राचा योगही या पौर्णिमेच्या धार्मिक महत्त्वात भर घालतो.
त्रिपुर वातीचे विशेष महत्त्व
महाराष्ट्रात त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये तसेच उंच दगडी दीपमाळांवर दिवे प्रज्वलित करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी ३६० किंवा ७२० सुतांची कापसाची विशेष 'त्रिपुर वात' तयार केली जाते. ही वात तूप किंवा तेलात भिजवून भक्तिभावाने प्रज्वलित केली जाते. त्रिपुर वातीच्या प्रकाशातून अज्ञान, नकारात्मकता आणि अंधकार दूर होऊन जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि मांगल्याचा प्रकाश निर्माण होवो, अशी प्रार्थना केली जाते.
या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, नदीकाठी तसेच मंदिरांमध्ये दीपदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. घराच्या अंगणात, तुळशी वृंदावनाजवळ, मंदिरांमध्ये आणि नदीघाटांवर दिवे लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला जातो. 'शुभं करोति कल्याणम्' म्हणत पणती प्रज्वलित करण्याची परंपरा आजही भारतीय संस्कृतीतील श्रद्धेचे आणि संस्कारांचे दर्शन घडवते.
इतर धर्मांमध्येही या दिवसाचे महत्त्व
कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांमध्येही विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात भगवान कार्तिकस्वामी अर्थात स्कंद यांच्या दर्शनाला महत्त्व दिले जाते. शीख धर्मीयांसाठी हा दिवस गुरुनानक जयंती अर्थात प्रकाशपर्व म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. बौद्ध परंपरेतही या दिवसाचा संबंध धम्मसेनापती सारिपुत्र यांच्या परिनिर्वाणाशी जोडला जातो.
तसेच प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होणाऱ्या तुळशी विवाहाची सांगता कार्तिक पौर्णिमेला होते. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दीपोत्सवातून मांगल्याचा संदेश
त्रिपुरारी पौर्णिमा हा केवळ दिवे लावण्याचा उत्सव नसून अंधकारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवणारा मंगलमय सोहळा आहे. प्रत्येकाने आपल्या घरात, अंगणात आणि मंदिरात दीप प्रज्वलित करून हा उत्सव भक्तिभावाने साजरा करावा. दीपज्योतीच्या प्रकाशातून आपल्या जीवनातील दुःख, निराशा आणि नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना!
देव दीपावलीच्या या मंगल पर्वावर सुख-समृद्धी नांदो अंगणी,
हर हर महादेवच्या नामाने पावन होवो ही पौर्णिमेची रजनी।
दीपज्योती परब्रह्म, हाच मंत्र आज जपूया,
त्रिपुर वात प्रज्वलित करून भक्तिभावाने नतमस्तक होऊया।
कार्तिक पौर्णिमेचा हा सोहळा आणो जीवनात नवा बहार,
ईश्वरकृपेने पूर्ण होवोत स्वप्ने, लाभो सुखाचा संसार।
त्रिपुर वातीच्या पवित्र तेजाप्रमाणे आयुष्य सदैव तेजोमय आणि मंगलमय राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
दीपोत्सवाच्या या मंगल क्षणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि आरोग्यसंपन्न, सुखी व समृद्ध आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!
लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन आणि आध्यात्मिक प्रशिक्षक, अभ्यासक, लेखिका व मार्गदर्शक
अनुभव : २३ वर्षांहून अधिक
मोबाईल : ९६३७१२५११९
إرسال تعليق