लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी धिरज देशमुख, तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव बिनविरोध
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!लातूर (प्रतिनिधी) :लातूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणा-या ‘दि लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ अर्थात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आज (बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६) सलग दुस-यांदा बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच बँकेच्या उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध वर्णी लागली असून, या निवडीमुळे लातूरच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने विरोधकांच्या ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत बहुमत मिळवले होते. आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी पार पडलेल्या विशेष सभेत इतर कोणाचाही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी धिरज देशमुख आणि अविनाश जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. निवड जाहीर होताच बँक परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.
यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये धिरज देशमुख यांची या बँकेच्या अध्यक्षपदी प्रथमच बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारत आपली छाप पाडली होती. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बँकेचा कारभार पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख ठेवण्यावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आधुनिक बँकिंग सेवा पोहोचवण्यात मोठे यश मिळवले आहे. विशेषत: शेतक-यांना पीक विमा परताव्याचे वेळेत वितरण करणे, ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्यांचे निवृत्तिवेतन थेट खात्यात जमा करणे आणि ग्रामीण भागात २४ तास एटीएम सुविधेसोबतच ‘मोबाईल एटीएम व्हॅन’ अर्थात फिरती बँक शाखा सुरू करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
दुस-यांदा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना धिरज देशमुख यांनी सर्व संचालक मंडळ, मतदार आणि लातूर जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. सहकार क्षेत्र हे शेतक-यांच्या प्रगतीचा कणा असून आगामी काळातही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि तरुण उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
إرسال تعليق