‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५७९ गावांना भेटी देत २७ हजार ८३७ नागरिकांशी साधला संवाद!

‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५७९ गावांना भेटी देत २७ हजार ८३७ नागरिकांशी साधला संवाद!
लातूर : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासोबतच पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी लातूर पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ या अभिनव उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत लातूर पोलिसांनी जिल्ह्यातील ५७९ गावांना भेटी देऊन तब्बल २७ हजार ८३७ नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच गावांच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक सहभाग वाढविण्यावर या उपक्रमातून विशेष भर दिला जात आहे.
या उपक्रमांतर्गत लातूर पोलीस विभागाने ‘बचत, सुरक्षा आणि प्रतिबंध’ ही त्रिसूत्री निश्चित केली आहे. या माध्यमातून गावोगावी नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याची बचत, नैसर्गिक व स्थानिक साधनसंपत्तीचे संवर्धन, गावातील सुरक्षितता तसेच संभाव्य सामाजिक आणि आर्थिक समस्यांना प्रतिबंध करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पाणीटंचाईच्या काळात उद्भवू शकणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून नागरिकांनी योग्य नियोजन आणि खबरदारी घ्यावी, यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.
‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम केवळ गावांना भेटी देण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आणि त्यावर योग्य उपाययोजना सुचविणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक गावातील परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जात आहे. यातून पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय व विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होत आहे.
ग्रामसुरक्षा दलाच्या स्थापनेतून गावांच्या सुरक्षेला बळ
या उपक्रमातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे गावोगावी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे. गावातील सामाजिक भान असणाऱ्या, सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याच्या तरुणांना एकत्रित करून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येत आहे. या माध्यमातून गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सामूहिकरीत्या पार पाडण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.
विशेषतः शेतातील पशुधन, शेतीची अवजारे आणि इतर मौल्यवान साहित्याच्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होऊन ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. त्यामुळे गावपातळीवर सुरक्षिततेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यास मदत होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणीच्या काळात पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास या उपक्रमातून दिला जात आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आणि गावाच्या संरक्षणात त्यांचा सहभाग वाढविणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
लातूर पोलीस विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळत असून, पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद, समन्वय, सहकार्य आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.
‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम म्हणजे केवळ पोलिसांची गावाला भेट नसून, गावातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा लातूर पोलीस दलाचा एक स्तुत्य व लोकाभिमुख प्रयत्न आहे.

Post a Comment

أحدث أقدم