लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीनिमित्त १६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निवडणुकीची मतमोजणी दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (तळमजला), लातूर येथे होणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये सर्व राजकीय पक्ष, कार्यालये आणि उमेदवारांचे मंडप तसेच दुकाने उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच या प्रतिबंधित क्षेत्रात मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांचा वापर करणे, संबंधित पक्षाच्या निवडणूक चिन्हांचे प्रदर्शन करणे आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना या परिसरात प्रवेश करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.
إرسال تعليق