४८३ गावांत पोहोचले लातूर पोलीस; २३ हजार नागरिकांशी संवादातून सुरक्षिततेचा जागर
लातूर : आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८३ गावांना भेटी देत पोलिसांनी तब्बल २३ हजार २२७ नागरिकांशी थेट संवाद साधला आहे.
पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीची कामे, पशुधनाची देखभाल तसेच नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटल्यास ग्रामीण भागात चोरी, घरफोडी तसेच शेती साहित्याची चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी आतापासूनच सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि गावपातळीवर सुरक्षिततेसाठी सामूहिक प्रयत्न करावेत, या उद्देशाने पोलीस दलाकडून जनजागृती केली जात आहे.
शेतकरी, पशुधन आणि शेती साहित्याच्या संरक्षणावर विशेष भर
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन, शेतीची अवजारे, कृषी साहित्य, विद्युत मोटारी आणि इतर मौल्यवान वस्तूंचे संरक्षण महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अनोळखी व संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि गावात कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावपातळीवर सुरक्षा व्यवस्था
या उपक्रमांतर्गत गावातील सुशिक्षित, उत्साही आणि स्वच्छ चारित्र्याच्या तरुणांना एकत्र आणून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या दलातील तरुणांच्या माध्यमातून गावात तसेच परिसरात गस्त घालणे, संशयास्पद व्यक्ती व हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे यावर भर दिला जात आहे. त्यामुळे गावपातळीवर सामूहिक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होत आहे.
पोलीस आणि नागरिकांमधील समन्वयाला बळ
‘पोलीस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी आणि अंमलदार प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासोबतच संभाव्य धोके, घ्यावयाची खबरदारी, गुन्हेगारी प्रतिबंध आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांचा या उपक्रमातील सहभाग वाढत आहे.
गुन्हा घडल्यानंतर केवळ कारवाई करण्यापुरती पोलिसांची भूमिका मर्यादित न ठेवता, गुन्हे घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून गावपातळीवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ४८३ गावांमध्ये पोहोचून २३ हजार २२७ नागरिकांशी साधलेला संवाद हा या उपक्रमाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाची साक्ष देत आहे.
पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, परस्पर सहकार्याची भावना जपावी आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसोबत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
إرسال تعليق