लातुरात मूर्ती दान उपक्रम राबविला जावा-माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

                लातुरात मूर्ती दान उपक्रम राबविला जावा-माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे



     लातूर/प्रतिनिधी:गणेशोत्सवास सुरुवात होत असून लातुरात घरोघरी गणपती मूर्ती उत्साहात स्थापन करण्यात येणार आहेत. लातूरकरांनी शक्यतो मातीचा गणपती मूर्तीची स्थापन करावी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने योगदान द्यावे असे आवाहन माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. तसेच मागील तीन वर्षांप्रमाणे यावर्षी इतर मूर्ती पाण्यात विसर्जित न करता मूर्ती दान उपक्रम राबविला जावा, यासाठी मनपा प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे  आवाहन केले आहे.गणेशोत्सव हा सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा केला जातो, यामध्ये अबालवृद्ध सहभागी होत असतात. मागील तीन वर्षात कोरोनाच्या सावटाखाली साजरा केले गेलेला गणेशोत्सव लातूरकरांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत राज्यासमोर आदर्श निर्माण केला. लातूरमध्ये मूर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणीं करत मूर्ती दान उपक्रम राबविला होता, मनपाच्या वतीने हजारो गणेश मूर्ती संकलित करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले होते. तसेच महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीची स्थापन केली होती. यामुळे लातूरची नोंद देशभरात घेण्यात आली. यावर्षी लातूर पाऊस पुरेसा झाल्याने पाण्याची उपलब्धता आहे, तसेच कोरोना काळातील बंधनांचा पार्श्वभूमीवर या वर्षीचा उत्सव बंधनमुक्त साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीतही लातूरकरांनी घरात मातीपासून बनलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करावी व घरातच त्याचे विसर्जन करून वृक्ष लावावा असे आवाहन माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे, तसेच मागील तीन वर्षांपासून चालत आलेला मूर्ती दान उपक्रम मनपा प्रशासनाने यावर्षीही राबवून आवश्यक त्या संकलन सुविधा प्रत्येक प्रभागात उपलब्ध करण्याबाबतचे आवाहन त्यांनी केले. यामुळे विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना टाळता येणार आहे. 
     विक्रांत गोजमगुंडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी ते आग्रही असतात, याची सुरुवात स्वतःपासून करत मागील ७ वर्षापासून गोजमगुंडे यांच्य घरी केवळ मातीपासून बनविलेल्या गणपतीची स्थापना केली जाते. तसेच मनपाच्या पुढाकारातून मागील तीन वर्ष त्यांनी गणेश मूर्ती या उपक्रमाला त्यांनी चालना दिली. याशिवाय गणेश विसर्जना वेळी त्या-त्या प्रभागात व कॉलनीत मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून देत हजारो मूर्तींचे संकलन त्यांनी केले होते. राज्यासाठी हा एक पथदर्शी प्रकल्प ठरला.यावेळी बोलताना विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, शिक्षणासोबतच विविध क्षेत्रातील पॅटर्नच्या निर्मितीसाठी लातूर ओळखले जाते. मागील काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करणे आणि या मूर्तींचे विसर्जन न करता त्या संकलित करण्याबाबत लातूरने अनोखा पॅटर्न निर्माण केलेला आहे. तसेच यानिमित्ताने जागतिक विक्रमाची नोंद लातूरकरांच्या नावे होण्याची संधी निर्माण होणार असल्याचेही मत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने