मातृदिन व बैलपोळा केशवराज विद्यालयात उत्साहात संपन्न

लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात मातृदिन व बैलपोळा असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी भारत माता व योगी अरविंद घोष यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.मंचावर शाळेचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर, पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड तसेच अभ्यास पूरक मंडळ प्रमुख शैलजा देशमुख, सहशिक्षिका रेणुका गिरी यांची उपस्थिती होती.यावेळी यशश्री मुंडे या विद्यार्थिनीने मातृदिन व बैलपोळा या विषयी माहिती सांगितली. भारतीय संस्कृतीमध्ये आईला दैवत मानतात.संस्कारातून यशाच्या शिखरावर चढवते ती आई असते असे ती म्हणाली.बैलपोळा हा सण ग्रामीण भागांमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो,अशी माहिती तिने विद्यार्थ्यांना दिली.संगीत विभागाच्या वतीने संतोष बीडकर व त्यांच्या संघाने आई आणि बैलपोळा यावरची 'हंबरून वासराला चाटती जवा गाय'','जिवा शिवाची बैल जोडी' ही गीते  सादर केली.श्री केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांनी आई व मूल यांचे नाते वात्सल्याचे व नैसर्गिक आहे असे मत व्यक्त केले.आपण आपल्या आईचा आदर करावा.माया,प्रेम, काळजी यातूनच हे नाते फुलते.आपलं मुल कितीही मोठं झालं तरी त्याची काळजी आई घेतच असते,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मान्यवरांचा परिचय व स्वागत कार्यक्रम प्रमुख सौ.इंदू ठाकूर यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदिती जाधव,आदिती पाटील या विद्यार्थिनींनी केले.जान्हवी गरुड या विद्यार्थिनीच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने