माता - पित्याची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे
आद्य कर्तव्य आहे : गहिनीनाथ महाराज औसेकर
लातूर : आपल्या संस्कृतीत माता - पित्याने साक्षात ईश्वराचे स्थान आहे. त्यामुळे आपल्या वृद्ध- माता - पित्याची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रोटरी क्लब लातूरच्या वतीने सोमवारी कोरे गार्डनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जीवनाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या मातृ व पितृ शक्तीच्या सन्मान सोहळ्यात गहिनीनाथ महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए सुनील कोचेटा हे होते. यावेळी मंचावर क्लबचे सचिव श्रीमंत कावळे, प्रकल्प प्रमुख शामसुंदर मानधना, प्रकल्प सहप्रमुख राघवेंद्र ईटकर यांची उपस्थिती होती. भारतमाता प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करताना हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या आई - वडिलांची सेवा न करणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना पंढरपूरला जाण्याचा कोणताही अधिकार नाही. मुलांनी भक्त पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून माता - पित्याची सेवा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. माता - पित्यांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलांप्रति तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांनी वृद्धाश्रम हा हिंदू धर्माला लागलेला कलंक असल्याची भावना व्यक्त केली.
धर्माप्रति असलेली श्रद्धा, नम्रता हेच हिंदू धर्माचे वैभव आहे , असे सांगून महाराज पुढे म्हणाले की, या जगावर साम्राज्य करणे खूप सहज - सोपे आहे. पण स्वतःवर, मनावर विजय मिळवून साम्राज्य करणे अत्यंत कठीण काम असते. जीवनात निरोगी आयुष्याची उपलब्धी हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती असते. विधात्याने आपल्या कपाळी जे लिहिलेले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. त्यासाठी जीवनात प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवणे गरजेचे आहे. आई - वडिलांच्या सेवेतच मुलांच्या जीवनाचे कल्याण अवलंबून असते, हे ओळखून वागण्याचा प्रयत्न आजच्या तरुण पिढीने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनील कोचेटा यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्याकामी क्लबने पुढाकार घेतल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामसुंदर मानधना यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विस्तृतपणे विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश दगडे व राजकुमार गिरवलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव श्रीमंत कावळे यांनी केले. यावेळी वयाची ७५ पूर्ण करणाऱ्या हुकूमचंदजी कोचेटा, मन्मथप्पा लोखंडे, सीए तेजमलजी बोरा, वैजनाथ पेन्सलवार, वैजयंती निलेगावकर, केशरबाई मानधना, विश्वनाथ इंगळे, प्रभावती इंगळे, गोपीकिशन बजाज, बसवराज उटगे,नंदकिशोर अग्रवाल, सरोज अग्रवाल, फुलाबाई कालिया, शांताबाई परदेशी, बंकटलाल सोनी, विमल इटकर, महादेव इंगळे , सत्यनारायण लड्डा, एड. मोहनराव जाधव प्रा. एन.एस. रेड्डी, उषाबाई गोरखे, सुभाषचंद्र सोमाणी यांसह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून देणाऱ्या नरेश कोरे यांचाही सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींच्यावतीने मन्मथप् पा लोखंडे व मोहनराव जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق